आळंदी: संत ज्ञानेश्वर माउलींच्या पावन अलंकापुरी नगरीत प्रदूषणाचे ग््राहण लागलेल्या इंद्रायणी नदीचे पर्यावरण संवर्धन व्हावे भाविक, वारकऱ्यांसाठी माता असलेल्या नदीला पूर्वीचे मूळ शुद्ध स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी आळंदी देवस्थानने पुढाकार घेतला असून, दर एकादशीला नदीची महाआरती करण्याचा महासंकल्प केला आहे. महाआरतीच्या माध्यमातून नदी प्रदूषण मुक्तीचा हा जागर भाविकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र सोमवारी (दि. 15) इंद्रायणी नदी घाटावर पार पडलेल्या इंद्रायणी नदी महाआरती कार्यक्रमाला भाविकांचा लाभलेल्या प्रतिसादावरून दिसून आले.
वैदिक मंत्रोच्चार, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि दीपांच्या उजेडात इंद्रायणी मातेची महाआरती करण्यात आली. या वेळी सुधाताई महाजन यांच्या हस्ते इंद्रायणी मातेचे जल पूजन व ओटी भरण करण्यात आले. या वेळी इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपणे, स्वच्छता राखणे व नदी प्रदूषण मुक्ती, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देवस्थानकडून देण्यात आला. या वेळी विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, ॲड. रोहिणी पवार, ॲड. राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम महाराज पाटील, देहू संस्थानचे अध्यक्ष बापुसाहेब मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त माधवी निगडे, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, माजी सभापती डी. डी. भोसले पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, तुकाराम माने, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले तसेच आळंदीकर ग््राामस्थ, वारकरी भाविक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महाआरतीचे पौराहित्य वेदमुर्ती निखिल मुरलीधर प्रसादे, शंतनु पोफळे, श्रीरंग तुर्की, सागर प्रसादे, विश्वेश्वर तुर्की, राजभाऊ चौधरी, राहुल धामरकर, विजय कुलकर्णी, ज्ञानेश्वर चौधरी आणि ज्ञानेश्वर जोशी यांनी केले. याप्रसंगी देवस्थानच्या विश्वस्त ॲड. रोहिणी पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, इंद्रायणी माता ही केवळ नदी नसून आळंदीची जीवनवाहिनी आहे. तिचे पावित्र्य, स्वच्छता आणि संवर्धन राखणे ही प्रत्येक भाविकाची सामूहिक जबाबदारी आहे. महाआरतीसारख्या उपक्रमांतून समाजात धार्मिकतेसोबत पर्यावरणीय जाणीव निर्माण व्हावी, हा देवस्थानचा उद्देश आहे.
चैतन्य महाराज कबीर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, वारकरी संप्रदायात नद्यांना मातेसमान मानले जाते. इंद्रायणी मातेचे स्वच्छ व निर्मळ रूप टिकवणे ही खरी भक्ती आहे. नामस्मरणासोबतच पर्यावरण संवर्धनाची जोड दिली तरच आपली परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचेल. आळंदी देवस्थानकडून पुढील काळात महिन्याच्या शुद्ध व वद्य एकादशीच्या दिवशी ही महाआरती नियमितपणे करण्यात येणार असून, भाविकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता भविष्यात ही आरती नित्य करण्याचा संकल्प देवस्थानने व्यक्त केला आहे.
दरम्यान, या आरती सोहळ्यासाठी ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांनी एक लक्ष रुपयांची देणगी आळंदी देवस्थानकडे सुपूर्त केली. या सहकार्याबद्दल देवस्थानच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. महाआरतीनंतर भाविकांनी इंद्रायणी मातेचे दर्शन घेतले.