HSRP Number Plate pudhari photo
पिंपरी चिंचवड

HSRP Number Plate Quality Issue: एचएसआरपी नंबर प्लेट ठरतेय वाहनधारकांची डोकेदुखी; काही महिन्यांतच रंग उडतोय, प्लेट निखळतेय

सुरक्षेसाठी अनिवार्य केलेल्या प्लेटच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; नवीन प्लेटसाठी वाहनधारकांच्या खिशाला २ ते ३ हजारांचा भुर्दंड

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: केंद्र व राज्य शासनाने वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) अनिवार्य केली आहे; परंतु प्लेटचा दर्जा निकृष्ट असल्याने अनेक वाहनधारकांच्या नंबरप्लेट काही महिन्यातंच निखळत आहेत. काहींचा तर रंग आणि कोटिंगही निघत आहे. त्यामुळे वाहनधारकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. सुमार दर्जाच्या नंबरप्लेटमुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करून नवीन नंबरप्लेटसाठी पुन:प्रक्रिया करावी लागत आहे.

एक एप्रिल २०१९ पासूनच्या नोंदणीकृत वाहनांसाठी एचएसआरपी नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. परिवहन विभागाने एचएसआरपीसाठी तीन खासगी कंपन्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत राज्यातील ५६ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन विभागात १५ डिसेंबर २०२४ पासून एचएसआरपी प्लेट उपलब्ध करुन दिल्या जात आहे. या प्लेटवर क्रोमियम होलोग्राम, लेझर, कोडेड युनिक क्रमांक, (आय.एन.डी) चिन्ह आणि टॅम्पर- प्रूफ लॉक यांसारखी आधुनिक सुरक्षा वैशिष्टये असतात, यामुळे बनावट नंबरप्लेट तयार करणे वाहन फसवणूक रोखण्यास मोठी मदत होते. मात्र प्रत्यक्षात प्लेटचा टिकाऊपणा आणि फिटिंगची गुणवत्ता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

प्लेटवरील अंक आणि अक्षरे प्रेस करुन छापली जात असल्यामुळे ती कायमस्वरुपी आहे. त्यामुळे कोणीही त्याची कॉपी करुन बनावट प्लेट तयार करुन शकत नाही. तसेच या नंबरप्लेट विशिष्ट रंगांनी तयार केलेल्या असल्यामुळे वाहनांचा नंबर लगेच कॅमेरात कैद होतो. मात्र नंबरप्लेटचा दर्जा खराब असल्यामुळे काही दिवसातच तिचा रंग उडत आहे. त्यामुळे नियमांचे उल्लघंन केले तरी कॅमेरात वाहन कैद होत नाही. किंवा नंबर कैद झाला तरी तो पुसट असल्यामुळे दुसऱ्या वाहनांवर कारवाई होते. त्यामुळे वाहनांची अचूक ओळख, चोरीला आळा,गुन्हे उघडकीस येण्यास आणि वाहतूक व्यवस्थापनास अडथळ निर्माण होत आहे.

नंबरप्लेटची डोकेदुखी

पूर्वी वाहनांच्या नबंरप्लेट नटबोल्ट लावून फिंटिग केल्या जात होत्या; परंतु गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी नटबोल्ट काढून नंबरप्लेट काढल्या जात होत्या. त्यामुळे परिवहन विभागाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सहज काढता येऊ नयेत म्हणून ॲल्युमिनिनियमच्या रिबिटद्वारे फिंटिग केल्या जात आहेत. मात्र रिबिट निकृष्ठ दर्जाच्या असल्यामुळे वाहनांचे कंपन (व्हायब्रेशन) खड्डयामध्ये वाहने आदळल्याने किंवा नंबरप्लेटला धक्का लागल्याने या नंबरप्लेट धक्क्याने निखळत आहेत. तसेच फिंटिग केंद्रे वाहनधारकांकडून आतिरिक्त फिटिंग चार्जेस घेत असल्याचे अनेक तक्रारी आहेत. काही ठिकाणी १५० ते ३०० रुपये अतिरिक्त शुल्क घेतले जात आहे. ब्रॅकेट किंवा मजबूत फिटिंगसाठी हे शुल्क आकारण्यात येत आहे.

वाहनधारकांच्या खिशाला झळ

एचएसआरपी प्लेट गहाळ झाल्यास पोलिसांत एफआयआर दाखल करावा लागतो. त्यानंतर नवीन प्लेटसाठी पुन्हा फी भरुन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्यानतंर संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागते. प्लेट फी, फिंटीग चार्जेस, एफआयआर, नवीन प्लेट प्रक्रिया यासाठी किमान दोन- तीन हजार रुपये खर्च होतात. यामुळे वेळेचाही अपव्यय होतो. विशेष म्हणजे अपघात, पूर किंवा इतर कारणांमुळे प्लेट नुकसान झाल्यासही ही प्रक्रिया अनिवार्य आहे.

केंद्र व राज्य शासनाने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) आनिवार्य केली आहे. तसेच एचएसआरपीचे कंत्राट शासनाने तीन कंपन्यांना दिले आहे. त्यामुळे कंपन्यांनी नियमानुसार योग्य दर्जाच्या नंबरप्लेट वाहनांना बसविणे बंधनकारक आहे.
राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT