नवलाख उंबरे: राज्य शासनाच्या आदेशानुसार जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत अनेक जागरूक नागरिकांनी आपल्या वाहनांच्या जुन्या नंबर प्लेट बदलून नवीन एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेतल्या. मात्र, आता हेच नागरिक प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
एचएसआरपी नंबर प्लेट बसविताना अनेक वाहनधारकांकडून जादा शुल्क आकारण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. स्लॉट मिळवण्यासाठी अनेकांना दिवसेंदिवस प्रतीक्षा करावी लागली, तर काहींनी आपली कामे बाजूला ठेवून वेळ काढत ही प्रक्रिया पूर्ण केली. नियमांचे पालन व्हावे, वाहनांची सुरक्षित ओळख पटावी आणि भविष्यात दंडात्मक कारवाई टाळता यावी, या उद्देशाने नागरिकांनी पैसा आणि वेळ दोन्ही खर्च केले.
महाराष्ट्र परिवहन विभागाने 18 फेबुवारी 2026 पासून एचएसआरपी नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच 31 डिसेंबरपूर्वी स्लॉट बुक केलेल्या वाहनधारकांना काही प्रमाणात सवलतही देण्यात आली होती. त्यामुळे एचएसआरपी न बसवलेल्या वाहनांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसत आहे. आता पुन्हा तारीख वाढवण्यात आली असून, जून महिनाअखेरपर्यंत अजून मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे अजूनही अनेक ठिकाणी जुन्या नंबर प्लेट असलेली वाहने रस्त्यावर सर्रास फिरताना दिसत आहेत. एवढेच नव्हे, तर काही वाहने थेट विनानंबर प्लेटच रस्त्यावर धावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नियम पाळणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. सारखी मुदतवाढ होत असल्यामुळे नागरिकांनी आता या गोष्टींना जास्त महत्त्व देत नसल्याचे दिसत आहे.
विना नंबरप्लेट धावतात वाहने
वाहनांची ओळख पटविणे, गुन्हेगारी रोखणे आणि वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणणे हा एचएसआरपीचा मुख्य उद्देश सांगितला जातो. मात्र, जेथे नंबर प्लेट नसलेली वाहनेच रस्त्यावर धावत आहेत तेथे नियमांचे पालन करणाऱ्यांनाच फक्त त्रास सहन करावा लागत असल्याची भावना वाढू लागली आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर दिसणारी परिस्थिती पाहता प्रशासन आता खरोखर कडक भूमिका घेणार का, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आम्ही हजारो रुपये खर्च करून, वेळ देऊन एचएसआरपी बसवली; पण आजही विनानंबर गाड्या रस्त्यावर मुक्तपणे फिरत असतील, तर प्रशासनाची कारवाई नेमकी कुठे आहे?ॲड. सागर शेटे, स्थानिक नागरिक
एचएसआरपी नियमांची अंमलबजावणी प्रशासनाचे सूचनेनुसार सुरू असून, भविष्यात नियमभंग करणाऱ्या वाहनांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे.गणेश लोंढे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, तळेगाव वाहतूक विभाग.