पिंपरी: हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते, वाहतूककोंडी, पाणीपुरवठा, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांनी रविवारी मूक मोर्चा काढला. 'स्मार्ट आयटी सिटी संकल्प'च्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या मोर्चा आयटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिंजवडी फेज-१ येथील इन्फोसिस सर्कलपासून मोर्चाला सुरुवात झाली. हातात मागण्यांचे फलक घेऊन कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.
या वेळी शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन पडवळ, पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, रामदास धनवटे, पुणे शहरप्रमुख वसंत मोरे, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार, सहसंपर्कप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, आमदार शंकर मांडेकर, शंकर जगताप, हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर, माजी सरपंच शाम हुलावळे यांसह आयटी फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने, ज्ञानेंद्र हुलसुरे, पुष्कराज निंबाळकर आदी उपस्थित होते.
हिंजवडीतील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरवस्था हा आयटी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवासातील प्रमुख प्रश्न आहेत. मेट्रो लवकर धावेल याबाबत वारंवार अशवासने, त्यात मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेला राडारोडा, धूळ आणि वाहतुकीतील अडथळ्यांची भर पडल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम असून, टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याची तक्रारही कर्मचाऱ्यांनी केली.
रस्ते आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसोबतच वीज, कचरा व्यवस्थापन, पादचारी सुविधा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नांकडेही मोर्चाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. आयटी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असताना त्या तुलनेत नागरी सुविधांचा विकास झालेला नसल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
आयटीयन्सच्या प्रमुख मागण्या
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत
वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात
सोसायट्यांचा पाणीप्रश्न सोडवून टँकरवरील अवलंबित्व कमी करावे
वीज व कचरा व्यवस्थापनाची सुविधा सक्षम करावी
मेट्रो प्रकल्पाला गती देऊन सेवा सुरू करावी
पादचारी आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा वाढवाव्यात
मी २०१२ मध्ये फ्रेशर म्हणून कंपनीत आलो. आयटी पार्क फिरायचो तेव्हा जी समस्या होत्या, त्याच समस्यास आताही आहेत. मेट्रो कामामुळे राडारोडा वाढला आहे. तोदेखील उचलला जात नाही. जी परिस्थिती होती ती आणखी गंभीर झाली आहे. बेसिक गरजा पूर्ण नाहीत, त्यामुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. टँकर लॉबीला खतपाणी घालण्याचे काम सुरू आहे. सर्रास सोसायट्यांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. आयटी हबमध्येच सुविधांचा बोजवारा आहे.गजानन अन्नमवार, आयटी अभियंता
आम्हाला याआधी २० वर्षांत कधी रस्त्यावर उतरण्याची गरज पडली नव्हती. कायम व्यस्त असणाऱ्या आयटी अभियंत्याला आज रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे. पुणे आयटी क्षेत्रामुळे ओळखले जाते. मात्र, याच आयटी क्षेत्रात रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. पाच हजार कोटींचा टॅक्स रेव्हेन्यू जनरेट होतो, तरी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नाही. बेसिक सुविधा नसतील तर विकासाची काय अपेक्षा करायची.सुशील गजरे, कर्मचारी
हिंजवडीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावी तसेच रस्ते, पाणी आणि वीज या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच परिसरातील विविध नागरी कामांसाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे. केवळ बैठका आणि आश्वासनांऐवजी कामांना कालमर्यादा निश्चित करून त्याची अंमलबजावणी करावी. चांगले रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा हव्या आहेत. आम्हाला अर्धवट उपाय नकोत, तर सर्वंकष विकास हवा आहे. प्रशासनाला हिंजवडीतील समस्या माहिती आहेत आणि आम्ही त्याबाबत सरकारकडे निवेदनेही दिली आहेत.पवनजीत माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज
राज्यात ज्या भागात उद्योग आणि मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते, त्याच भागात पायाभूत सुविधांची अवस्था बिकट झाली आहे. महाराष्ट्रातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात जीएसटी मिळतो. त्याच्या तुलनेत राज्याला किती परतावा मिळतो आणि त्यातील किती निधी औद्योगिक क्षेत्रांच्या दीर्घकालीन विकासासाठी वापरला जातो, याचा विचार होणे गरजेचे आहे. हिंजवडीसारख्या आयटी हबमध्ये मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे दुर्दैवी आहे. रस्ते, खड्डे, पाणी आणि कचऱ्यासारख्या प्रश्नांसाठी आयटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे. चाकणमध्येही पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे काही उद्योग स्थलांतराचा विचार करत असल्याचे समोर आले आहे. उद्योगांच्या परिसरात अशा समस्या कायम राहिल्यास रोजगारावरही परिणाम होऊ शकतो.आदित्य ठाकरे, शिवसेना नेते तथा आमदार