

पिंपरी: बिजलीनगर येथील चिंचवड सबस्टेशनमध्ये रविवारी (दि. ६) दुपारी १२.२६ च्या सुमारास अक्षर लाईन फिडरची सीटी (करंट ट्रान्सफॉर्मर) फुटल्याने पिंपरी-चिंचवडसह गणेशखिंड, रहाटणी आणि अन्य भागांतील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. या वेळी सुरक्षेच्यादृष्टीने ८ मेट्रो प्लॅटफॉर्मवरच थांबविण्यात आल्या होत्या. वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील ३ लाख १० हजार ग्राहकांना याची झळ बसली.
रविवाारी एका क्षणात चिंचवड सबस्टेशनचा वीजपुरवठा कोलमडला आणि तब्बल २०० मेगावॅटचा वीजपुरवठा खंडित झाला. स्फोटानंतर एका ट्रान्सफॉर्मरसह चार २२ केव्ही फिडरचे स्विचगिअर आणि अन्य विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत करणे हे काम न रहाता बिघडलेली संरक्षण यंत्रणा, डीसी फेल्युअर आणि जळालेली उपकरणे शोधून त्यांची दुरुस्ती करण्याचे आव्हान महापारेषणच्या अभियंते-कर्मचाऱ्यां समोर उभे राहिले. घटनेनंतर सबस्टेशनमध्ये जळलेल्या तारा, विद्युत साधने आणि ट्रान्सफॉर्मरमधून सांडलेले जळके तेल यामुळे काम आणखी कठीण झाले. डीसी फेल्युअर नेमका कुठे झाला, याचा शोध घेण्याचे काम अभियंते आणि कर्मचारी करत होते. दरम्यान, शहरातील नागरिक आणि व्यावसायिकांना या वीजखंडितचा थेट फटका बसला. घरातील पंखे, मनोरंजनाची साधने आणि अन्य विद्युत उपकरणे बंद पडली. पीठ गिरणी, लॉन्ड्री, हॉटेल आणि विविध आस्थापनांमधील कामकाजावर परिणाम झाला. रविवारच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालविण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांचा 'फॅमिली टाइम' अचानक अंधारात गेल्याच्या सूर कानावर येत होता.
संरक्षण यंत्रणेलाही फटका
अक्षर लाईन फिडरची सीटी फुटल्यानंतर सबस्टेशनमधील विद्युत संरक्षण यंत्रणेवर परिणाम झाला. त्यामुळे नुकसान वाढत गेले. एका ट्रान्सफॉर्मरसह चार २२ केव्ही फिडरचे स्विचगिअर आणि इतर उपकरणे बाधित झाली. त्यानंतर चिंचवड सबस्टेशनचा पुरवठा खंडित होऊन सुमारे २०० मेगावॅटचा भार अंधारात गेला.
मेट्रो प्लॅटफॉर्मवरच
दुपारी १२.२५ वाजता मुख्य कर्षण वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने पुणे मेट्रो मार्गिका १ वरील वाहतुकीवर परिणाम झाला. सुरक्षेच्यादृष्टीने मार्गावरील ८ मेट्रो गाड्या प्लॅटफॉर्मवरच थांबविण्यात आल्या होत्या. मेट्रो प्रशासनाने तातडीने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून दुपारी १२.४७ वाजता २५ केव्ही ओएचई वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यानंतर सर्व ८ गाड्या सुरक्षितपणे मार्गावर रवाना करण्यात आल्या. दुपारी १.०६ वाजता स्थानकांसाठीचा ३३ केव्ही वीजपुरवठाही सुरळीत झाला. रेंज हिल्स सबस्टेशनचा महावितरणकडील मुख्य वीजपुरवठा दुपारी १.५० वाजता पूर्णपणे पूर्ववत करण्यात आला.
कुठे किती तास अंधार?
महापारेषणच्या चिंचवड उपकेंद्रातील बिघाडामुळे दुपारी १२.२५ वाजता वीजपुरवठा खंडित झाला. बहुतांश प्रभावित भागात सुमारे २ तास ३५ मिनिटांनी, म्हणजे दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड परिसरातील वीजपुरवठा १ तास २५ मिनिटांत सुरू झाला. मात्र, आंबेठाणमध्ये वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी तब्बल ३ तास ५५ मिनिटे लागली. निगडी, यमुनानगर, बिजलीनगर, रावेत, मामुर्डी, देहूरोड, चिंचवड, ताथवडे व वाकड परिसरातील सव्वालाख ग्राहकांना त्याहून अधिक काळ वीजखंडितचा सामना करावा लागला.
जळक्या तेलातही कर्मचाऱ्यांची झुंज
स्फोटानंतर ट्रान्सफॉर्मरमधून सांडलेले जळके तेल, जळालेल्या तारा आणि विद्युत उपकरणे हटविण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर होते. घटना घडल्यापासून कर्मचारी सातत्याने घटनास्थळी काम करत होते. जळालेली यंत्रणा हटवून प्रत्येक पॉइंट तपासला जात होता.
छोट्या व्यावसायिाकांचे नुकसान
वीजखंडितचा परिणाम घरापुरता मर्यादित राहिला नाही. पीठ गिरणी, लॉन्ड्री, हॉटेल, मंडई आणि विविध आस्थापनांचे कामकाज ठप्प झाले. यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवार असल्याने अनेक कुटुंबांचा फॅमिली टाइम विस्कळीत झाला. पंखे, मनोरंजनाची साधने आणि घरातील अन्य विद्युत उपकरणे बंद पडल्याने नागरिकांना पाऊस आणि उकाड्याचा सामना करावा लागला.
१३० मेगावॅटचा पुरवठा तीन तासांत सुरू
गणेशखिंडचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने कोथरूडला वळवून पहिल्याच तासात सुरू करण्यात आला. चिंचवड व एनसीएलचा पुरवठाही टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या तीन तासांत सुमारे १३० मेगावॅट पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. उर्वरित पुरवठा सुरू करण्यासाठी अभियंते व कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत.
दुपारी तीनपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत
महापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातील बिघाडाचा थेट परिणाम सुमारे ३ लाख १० हजार ग्राहकांवर झाला. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी परिसरातील सुमारे २ लाख ६० हजार, तर शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, बालगंधर्व परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा काही काळ खंडित झाला. बहुतांश भागातील वीजपुरवठा दुपारी तीनपर्यंत पूर्ववत करण्यात आला. मात्र निगडी, यमुनानगर, बिजलीनगर, रावेत, मामुर्डी, देहूरोड, चिंचवड, ताथवडे व वाकड परिसरातील सुमारे सव्वालाख ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी विलंब झाला.
पुणे शहरालाही फटका
चिंचवड उपकेंद्रातील बिघाडाचा परिणाम पिंपरी-चिंचवडपुरता मर्यादित राहिला नाही. रहाटणी व गणेशखिंड १३२ केव्ही वाहिनीवर परिणाम झाल्याने शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रोड, मॉडेल कॉलनी, बालगंधर्व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. गणेशखिंड उपकेंद्रातून पुणे मेट्रोलाही वीजपुरवठा होत असल्याने मेट्रो सेवेलाही काही काळ परिणाम झाला. दुसरीकडे, आंबेठाण उपकेंद्रातील बिघाडामुळे सुमारे दीड हजार उद्योगांना वीजखंडितचा फटका बसला. तळेगावचा घरगुती वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला. मात्र, औद्योगिक वीजपुरवठा पूर्ववत करताना तांत्रिक अडचणी आल्या.
महापारेषणच्या यंत्रणेत वारंवार फिडर स्विचिंगची वेळ येत असेल आणि त्यातून ८० मेगावॅटचा फिडर खराब होऊन त्याजागी ५० मेगावॅटचा लावण्याची वेळ येत असेल, तर ही गंभीर बाब आहे. यंत्रणेवर ताण येत असेल तर नियमित देखभाल-दुरुस्ती का केली जात नाही?, भविष्यातील वाढता भार लक्षात घेऊन जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर आणि स्टँडबाय व्यवस्था आधीच का उभारली जात नाही?, उद्योगांना अखंड वीजपुरवठा मिळणे ही मूलभूत गरज आहे. आग लागल्यानंतर पाणी शोधण्यापेक्षा आग लागूच नये यासाठी प्रतिबंधात्मक देखभाल आणि सक्षम यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. वारंवार वीजखंडितचा फटका उद्योगांना बसत राहिला तर त्याचा परिणाम उत्पादन, कामगार आणि संपूर्ण औद्योगिक अर्थचक्रावर होईल.
संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना
अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. घटनेची तांत्रिक कारणे तपासली जात असून, नुकसानग्रस्त उपकरणांची पाहणी करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दीपक मदने, कार्यकारी अभियंता, ॲापरेशन मेंटेंनंस विभाग, महावितरण
महावितरण वीजपुरवठा खंडित झाल्याने आमच्या व्यवसायावर थेट परिणाम झाला आहे. दुकानांमधील व्यवहार, ऑनलाइन पेमेंट, एसी-फ्रिजसह इतर उपकरणे बंद पडल्याने मोठी गैरसोय झाली. सणासुदीचा आणि व्यवसायाचा महत्त्वाचा काळ असल्याने वीजपुरवठा लवकर पूर्ववत करावा.
महेश सुतार, व्यावसायिक