Hinjewadi Shivajinagar Metro Pudhari
पिंपरी चिंचवड

Hinjawadi Shivajinagar Metro: पुणेकरांची प्रतीक्षा संपणार? हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे ३ नोव्हेंबरला उद्घाटन होण्याची शक्यता

पीएमआरडीए आयुक्तांकडून मेट्रो स्थानकांची पाहणी; १७ स्थानकांना सुरक्षा मंजुरी, प्रवासी सेवा सुरू करण्याच्या तयारीला वेग

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे येत्या ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद‌्घाटन करण्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवार (दि. २७) मेट्रो स्थानके व परिसराचा पाहणी दौरा करून तयारीचा आढावा घेतला. या वेळी अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी या उपस्थित होत्या.

हिंजवडीतील आयटी पार्कसह पिंपरी-चिंचवड व पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. मेट्रोच्या उद‌्घाटनासाठी यापूर्वी काही तारखा चर्चेत होत्या; परंतु वेळोवेळी विविध कारणास्तव मेट्रो सेवा सुरू होऊ शकली नव्हती. मात्र, आता पंतप्रधान व्हर्च्युअल पद्धतीने कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने नियोजित तारखेलाच उद‌्घाटन होण्याची शक्यता आहे.

उद‌्घाटनाचा सोहळा बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.

मेट्रोच्या या मार्गावरील १७ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून त्यांना सुरक्षा मंजुरी (CMRS) मिळालेली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू होईल. तर ६ स्टेशनचे काम अद्याप सुरू आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे लागू असलेली आचारसंहिता संपल्यानंतर या उद‌्घाटनाचा मार्ग मोकळा होईल. पीएमआरडीए आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यामुळे उद‌्घाटनाच्या तयारीला वेग आल्याचे चित्र आहे. पुढील दोन दिवसांत प्रवासी सेवा सुरू होण्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT