Fuel Supply Alert Pudhari
पिंपरी चिंचवड

Maharashtra Fuel Supply Alert: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर पोलिसांचा सतर्क नजर

पेट्रोल पंपांवरील गर्दी, अफवा आणि पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी राज्यभर पोलिसांना अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धाच्या परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पेट्रोल, डिझेल गॅस पुरवठ्याशी संबंधित कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एसआयडी) मुख्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या सूचनांनुसार सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मध्यपूर्वेतील तणावपूर्ण वातावरणाने विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अस्थिरता आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक या सामुद्रधुनीतून होत असल्याने या भागात निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम इंधनाच्या उपलब्धतेवर तसेच दरवाढीवरही होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या आयात-आधारित देशांवर परिणाम होण्याची शक्यतेने राज्य सरकारनेही खबरदारीची भूमिका घेतली आहे. इंधन पुरवठ्याशी संबंधित कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या वितरण साखळीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांना विशेष सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पेट्रोल पंपांवर गर्दी होण्याची शक्यता

युद्धजन्य परिस्थितीची बातमी किंवा सोशल मीडियावरील अफवा यामुळे अनेकदा नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते. अशा परिस्थितीत पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा होईल या भीतीने काही नागरिक मोठ्या प्रमाणावर इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करतात. त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागणे, किरकोळ वाद, गोंधळ किंवा वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी संबंधित पेट्रोल पंपांवर आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याबाबात आदेशात नमूद आहे.

पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्यावर भर

पेट्रोलियम पदार्थांचा साठा, वाहतूक आणि वितरण यांची सुरक्षितता राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तेल कंपन्यांच्या डेपो, गॅस गोदामे, टँकर वाहतूक मार्ग आणि वितरण केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिस गस्त वाढवून पुरवठा साखळीमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पेट्रोलियम कंपन्या व गॅस पुरवठा करणाऱ्या संस्थांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या पुरवठा व्यवस्थेमध्ये अडचण येणार नाही यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

अफवांवर नियंत्रणाची सूचना

सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरून विविध प्रकारच्या अफवा झपाट्याने पसरतात. इंधन तुटवडा, गॅस सिलिंडर मिळणार नाही, पेट्रोल पंप बंद होणार अशा प्रकारच्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. अशा अफवांमुळे अनावश्यक गर्दी, गोंधळ किंवा असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांना सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अफवा पसरविणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याबरोबरच अशा अफवांमागे संघटित स्वरूपाचा कोणताही स्रोत आढळल्यास त्याची माहिती तात्काळ मुख्यालयाला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रशासनाशी समन्वय आवश्यक

पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाल्यास त्याचा परिणाम केवळ वाहतूक क्षेत्रावरच नाही तर विविध सेवा क्षेत्रांवरही होऊ शकतो. हॉटेल, खानावळी, कॅन्टीन, उद्योग किंवा लघुउद्योग यांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्थानिक स्तरावर असंतोष किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी व पुरवठा यंत्रणेशी सातत्याने संपर्क ठेवून पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.

गोपनीय पथकांना अलर्ट

इंधन दरवाढ किंवा पुरवठ्यातील अडचणी यामुळे काही ठिकाणी आंदोलने किंवा सार्वजनिक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. यासाठी स्थानिक पोलिसांचा गोपनीय विभागाला अलर्ट देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, स्थानिक पातळीवर समन्वय साधणे आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवणे यावर प्रशासनाने भर दिल्याचे दिसून येत आहे.

दररोज अहवाल सादर करण्याचे आदेश

या संदर्भात पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांचा तपशील दररोज सकाळी 10 वाजेपर्यंत मुख्यालयाकडे पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे परिस्थितीवर राज्यस्तरावर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

मध्यपूर्वेतील परिस्थिती लक्षात घेता पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्याशी संबंधित कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पेट्रोल पंप, गॅस वितरण केंद्रे आणि वाहतूक मार्गांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. तसेच सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवरही कडक नजर ठेवली जात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रशासनाला सहकार्य करावे
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT