पिंपरी : मोहननगर येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालय (ईएसआय) रुग्णालयात निवृत्त डॉक्टरांची नेमणूक केली आहे. हे निवृत्त डॉक्टर रुग्णांची कोणतीही तपासणी न करता गोळ्या आणि औषधे देत आहेत. तसेच त्यांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या कामगार रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना उपचाराऐवजी मन: स्ताप होत आहे.
मोहननगर येथील रुग्णालयात पिंपरी चिंचवड, चाकण, लोणावळा, हिंवजडी परिसरातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्याशिवाय पुण्यातील रुग्णदेखील उपचारासाठी येतात. उद्योग व्यापार क्षेत्रातील ईएसआय सुविधेचा लाभ घेण्याऱ्या कामगार कर्मचाऱ्यांसाठी हे रुग्णालय उपयुक्त आहे. मात्र, अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना पूर्णत: उपचार मिळत नसल्याची तक्रार कामगार करत आहेत.(Latest Pimpri chinchwad News)
खासगी रुग्णालयातील महागड्या उपचारांऐवजी ईएसआय रुग्णालय कामगारांसाठी सोयीचे आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 16 लाख 28 हजार कामगार आहेत. त्यातील केवळ 6 लाख 50 हजार कामगारांची ईएसआय नोंदणी झाली आहे. त्यामुळे इतर कामगारांना लाखो रुपये भरून खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. नवीन सुविधांची माहिती कामागरांना होण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे.
महिलांची प्रसूती, हाडाच्या शस्त्रक्रिया, अपघात झालेल्या रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार व इतर शस्त्रक्रियाची सोय आहे. शल्यविशारद, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, कान - नाक - घसा आदी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत.
रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र विभाग प्रस्तावित आहे. हा विभाग सुरू झाल्यानंतर मोतीबिंदू तिरळेपणा आदी डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. मानसोपचार, त्वचारोग, दंतोपचार आदी सुविधांचे नियोजन आहे.
रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर नाही. त्यामुळे गरोदर महिला आणि इतर रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून सोनोग्राफी करावी लागते. रुग्णाला सकाळी सोनोग्राफीकरिता नेले की त्याला सायंकाळीच आणले जाते. यामध्ये ज्यांना उपाशीपोटी सोनोग्राफी करायची असते अशा रुग्णांचे हाल होते. तर इतर रुग्णांना ताटकळत बसावे लागते. अशा परिस्थितीत रुग्णांना चक्कर येणे अशा घटना घडतात.
रुग्णालयात निवृत्त डॉक्टरांची नेमणूक केली आहे. हे डॉक्टर वयोवृद्ध असल्याने ते रुग्णांना तपासतदेखील नाही. फक्त विचारणा करून गोळ्या औषधे देतात. एखाद्याला गाठ असेल, ताप असेल, पोट दुखत असेल तरी त्याची तपासणी केली जात नाही. त्यामुळे रुग्णांचा आजार बरा व्हायला वेळ लागतो. तसेच रुग्णांना नीट वागणूक दिली जात नाहीत. इतर तपासणीच्या सुविधा नसल्याने रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात जावे लागते, असे एका कामगाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
ईएसआय रुग्णालयात डोळ्यांवरील मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध नाही. तसेच दंतोपचाराच्या सुविधेचादेखील अभाव आहे. रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज 300 ते 350 रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडत आहे. किडनी, हृदयाचे आजार, मेंदूचे आजारांवरील उपचाराच्या सुविधा रुग्णालयात उपलब्ध नाहीत. त्यामुळे या उपचारासाठी टायअप झालेल्या खासगी रुग्णालयात पाठविण्यात येते.
रुग्णालयाला नवीन डॉक्टर्स मिळत नसल्याने निवृत्त डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णालयात हळूहळू सर्व सुविधा सुरु करण्यात येणार आहेत. रुग्णालयात मनोसोपचार, त्वचारोग, दंतोपचार, नेत्ररोग विभागदेखील सुरू केला जाणार आहे. सोनोग्राफी येत्या आठवडाभरात सुरू होईल. फक्त पालिकेची परवानगी मिळणे बाकी आहे.वर्षा सुपे (वैद्यकीय अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहननगर)