

खडकवासला : हजारो पर्यटकांनी रविवारी (दि. 9) सिंहगड किल्ल्यासह राजगड, तोरणा गडकोटांवर तसेच खडकवासला धरण चौपाटीसह पानशेत, वरसगाव धरण परिसरात धाव घेतली होती. त्यामुळे सिंहगड, राजगड सकाळपासूनच पर्यटकांनी फुल्ल झाले होते.
सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर वाहतूक प्रचंड कोंडी होऊन डोणजे गोळेवाडी टोल नाका, कोंढणपूर फाट्यापासून थेट गडाच्या वाहनतळापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने महिला, लहान मुले वृद्धासह पर्यटकांचे हाल झाले.(Latest Pune News)
सिंहगडावर वाहनाने जाणाऱ्या पर्यटकांकडून शनिवारी व रविवारी अशा दोन दिवसांत 1 लाख 80 हजार रुपयांची टोल वसुली केली.
पुणे-पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरण चौपाटीच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प पडली. दुपार नंतर मंदगतीने वाहतूक सुरू होती. सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होऊन डोणजे चौकापासून डीआयटी, खडकवासला ते कोल्हेवाडी, किरकटवाडी फाट्यावसह नांदेडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करणार याचा अंदाज घेऊन वनविभागाने सिंहगड घाट रस्त्यावर वाहतूक नियोजन केले होते. सकाळपासून वाहतूक सुरळीत होती. मात्र, दुपारी बारानंतर मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने त्यामुळे घाट रस्त्यावरील वाहतूक कोलमडली. सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्यासाठी वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांच्या देखरेखीखाली वनरक्षक धावपळ करत होते. टप्प्या-टप्प्याने वाहतूक बंद करून गडावरून खाली येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहुन गडावर वाहने सोडली जात होती. घाट रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सिंहगड किल्ल्यावर रविवारी दिवसभरात वीस ते पंचवीस हजारावर पर्यटकांनी हजेरी लावली. घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने अनेकजण पायी चालत गडावर गेले. अतकरवाडी पायी मार्गाने दिवसभरात पाच हजारांहून अधिक पर्यटकांनी चढाई केली.
सिंहगडावर शनिवारी (दि. 8) दिवसभरात पर्यटकांची दुचाकी 746 व चारचाकी 344 वाहने गेली. शनिवारी दिवसभरात 71 हजार 800 रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. रविवारी वाहनांची संख्या शनिवारपेक्षा वीस ते पंचवीस टक्के अधिक असल्याने जवळपास एक लाख रुपयांची टोल वसुली झाली आहे.
राजगड किल्ल्यावर दिवसभरात पाच हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली.
पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माचीसह गडाचा परिसर गजबजून गेला होता. गडाचे पहारेकरी विशाल पिलावरे, बाप्पू साबळे सकाळपासून गडावर तैनात होते.
पर्यटकांनी रविवारी सिंहगड किल्ल्यावर धाव घेतली होती. त्यामुळे गडाच्या घाट रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.