नवी सांगवी : आगामी महापालिका निवडणुका जवळ आल्याने शहरात राजकीय घडामोडी वेग घेत आहेत. उमेदवारांची धावपळ, बैठका, मेळावे आणि जनसंपर्क यात्रांमुळे शहरातील वाहतुकीची दैनंदिन गतीही वाढली आहे. या वाढलेल्या हालचालींचा मोठा फायदा सध्या रिक्षाचालकांना होत असून, पोस्टर व अन्य प्रचार साहित्य वाहतुकीसाठी रिक्षांची मागणी वाढल्याने सध्या रिक्षा व्यवसायात ‘सुगीचे दिवस’ सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
रिक्षा हे सतत शहरभर फिरणारे वाहन असल्याने प्रचारासाठी अत्यंत प्रभावी माध्यम मानले जाते. या ‘मोबाइल होर्डिंग’ माध्यमाची किंमत इच्छुक उमेदवारांना चांगलीच कळलेली असल्यामुळे रिक्षांवर पोस्टर लावण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः चढाओढ सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर पोस्टर लावण्यासाठी रिक्षाचालकांनाच आगाऊ मानधन देण्याची ऑफर देण्यात येत असल्याची चर्चा आहे.
रिक्षांचे प्रमुख चौक, बसथांबे, रेल्वे स्टेशन परिसर किंवा कॉलेज परिसरात वारंवार फिरतात, त्या रिक्षांना सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीबरोबर ही बाब रिक्षाचालकांसाठी दुहेरी फायदा देणारी ठरत आहे. दरम्यान आगामी काळात मनपा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर होताच त्यांचा प्रचार आणखी जोमाने सुरू होणार आहे. त्यामुळे रिक्षांवर प्रचारविषयक पोस्टर लावण्याची ही स्पर्धा अजून वाढण्याचे संकेत आहेत.
शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी सतत फिरणाऱ्या रिक्षा हे प्रचारासाठी सर्वात प्रभावी माध्यम ठरत असल्याने कमी खर्चात गल्लोगल्लीच्या नागरिकांपर्यंत पोहचण्याचा पर्याय म्हणून रिक्षांवर प्रचार पोस्टर लावण्यासाठी भावी उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः चढाओढ सुरू झाली आहे. अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रिक्षाचालकांना पोस्टर लावण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत.
रिक्षाचालकांसमोर पेच निर्माण झाला आहे. अनेक उमेदवार, पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते हे बहुतेक रिक्षाचालकांचे परिचित असल्याने, कोणाच्या पोस्टरला प्राधान्य द्यावे हा प्रश्न सध्या रिक्षाचालकांना सतावत आहे. काही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे की, एका पक्षाचे पोस्टर लावलं की दुसरा नाराज होतो. दोघेही ओळखीचे असतील तर अजूनच अडचण होते. दरम्यान काही रिक्षाचालकांनी या पेचातून मार्ग काढण्यासाठी ‘पहले आओ, पहले पाओ’ ही पद्धत अवलंबण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी राजकीय वाद टाळण्यासाठी थेट आम्ही राजकीय पोस्टर लावत नाही, असे सांगण्याचा पर्याय निवडला आहे.