पिंपरी : चऱ्होलीतील वडमुखवाडी येथे व्यावसायिक नितीन गिलबिले यांचा गोळीबार करून खून करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक केल्यानंतर हे प्रकरण धक्कादायक वळणावर येऊन ठेपले आहे.
खुनाचा सूत्रधार म्हणून माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर यांचे नाव समोर आले असून, दिघी पोलिसांनी त्याचा आरोपींमध्ये समावेश केला आहे. तापकीर याचा या गुन्ह्यातील सहभाग कोणत्या स्वरूपाचा, हे तपासात स्पष्ट व्हायचे असले तरी त्यांचे नाव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नितीन शंकर गिलबिले (37, रा. वडमुखवाडी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी अमित जीवन पठारे (35, रा. पठारेमळा, चऱ्होली), विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोळू, ता. खेड) आणि सुमित फुलचंद पटेल (31, रा. गायकवाडनगर, दिघी) या तिघांना जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अलंकापुरम रस्त्यावर गिलबिले आणि त्यांच्या ओळखीतील काही जण थांबलेले असताना अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे फॉर्च्यूनर कारमधून तेथे आले. त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवून त्यांच्या डोक्यात जवळून गोळी झाडली. गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी त्यानंतर पसार झाले.
दरम्यान, आरोपी ताम्हिणी घाट परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या भागात शोधमोहीम राबवताना विना नंबर प्लेटची एक मोटार संशयित अवस्थेत दिसली. पोलिसांनी पाठलाग करून मोटार ताब्यात घेतली आणि विक्रांत ठाकूर व सुमित पटेल यांना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार व मोबाईल जप्त करण्यात आले. मुख्य आरोपी अमित पठारे याला दिघी पोलिसांनी वाघोली येथून अटक केली. सुमित पटेल हा गोळीबाराच्या आधी व नंतरही आरोपींसोबत फिरत होता, त्यामुळे त्याचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.
खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र तपासादरम्यान तापकीर यांचे नाव आरोपींकडून समोर येत असल्याने तपासाची दिशा बदलली आहे. गुन्ह्यातील अचूक कारण, संबंध, आर्थिक किंवा वैयक्तिक वाद, तसेच तापकीर याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हस्तक्षेप याबाबत पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू आहे. तापकीर याचा शोध सुरू करण्यात आला असून दिघी पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. तपास दिघी पोलिस करत आहेत.
नितीन गिलबिले खून प्रकरणात किसन महाराज यांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, त्यांचे नाव आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.प्रमोद वाघ, वरिष्ठ निरीक्षक, दिघी पोलिस