

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे परिसरात दिवाळी झाल्यानंतर कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाह भक्तिमय वातावरणात झाल्यानंतर लगीनसराई जोरात सुरू आहे. यामुळे मंगल कार्यालय मालकांची, पौराहित्य करणा-यांची, पारंपरिक वाद्य वाजविणा-यांची, क?टरींग मालकांची, घोडेमालकांची जोरात चलती असून, त्यांचा व्यवसाय तेजीत आहे; परंतु लग्नकार्यात वर्ऱ्हाडीमंडळींपेक्षा निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांचीच संख्या जास्त दिसून येत आहे.
या व्यावसायिकांच्या तारखा लगेच मिळतीलच असे नाही. अनेक ठिकाणी यांच्या रिकाम्या तारखांनुसार विवाह मुहूर्त काढावे लागत आहेत. कार्यालये बुक झाली आहेत. आणखी बुक होत आहेत. सध्या नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे जनसंपर्क वाढविण्यासाठी विवाहास हजर राहण्यासाठी माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, स्वयंघोषित पुढारी, अनेक इच्छुक हजर रहात आहेत. यामुळे माईकवर स्वागत करणा-यांची दमछाक होत आहे.
कोणाचे नाव विसरणार नाही, याबाबत ते काळजी घेत आहेत. दोन-तीन माईकही कमी पडत आहेत. लग्न लागण्यापूर्वी वधू-वरांना शुभेच्छा देणा-यांचीही संख्या वाढत आहे. या वेळी काहीजण वेळेचे भानही राखत नाहीत. ते प्रचार सभेप्रमाणे भाषण करतात. अनेकजण दोन्ही कुटुंबांचा इतिहास सांगतात. या कुटुंबांशी असलेली, नसलेली जवळीक सांगतात. वधू-वरांचे भावी आयुष्यात कसे वागावे याबाबत सल्लेही देतात, अशा भाषणांमुळे विवाह मुहूर्त टळत असतोच; परंतु नवरा-नवरींना, दोघांच्या मामांना आणि लग्नास आलेल्यांना विनाकारण ताटकळत बसावे लागत आहे. काहींना अनेक ठिकाणी लग्नास जायचे असल्यामुळे सकाळपासूनच ते मंगल कार्यालयात हजेरी लावून यजमानांची भेट घेतात. लग्नास सुरवात झाली की काहीजण लगेच कार्यालयातून नमस्कार करीत जातात.
आजकाल बहुतांश समाज लग्नसोहळ्यासाठी येतो. परंतु आलेला प्रत्येक व्यक्ती लग्नमंडपात जेवण करत नसल्याने येणार्ऱ्या पाहुण्यांचा आणि कार्यासाठी केलेल्या जेवणाचा अंदाज संंबंधित व्यक्तींना येत नाही. बहुतांश पाहुणे अक्षदा टाकला की निघून जातात. यामुळे निमंत्रितांचा अंदाज घेऊन बनविलेला स्वयंपाक वाया जात आहे. अनेकजण लग्नकार्यात न जेवता बाहेर हॉटेलवर जेवणास प्राधान्य देत आहेत. यामुळे लग्नकार्य करणार्ऱ्या व्यक्तींचे मोठे नुकसान होत आहे.