

सोमाटणे : मावळातील साळुंबे गावात रविवार, 20 नोव्हेंबर रोजी रात्री बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साळुंबे गावचे ग््राामस्थ दिलीप राक्षे यांच्या घराजवळील गोठ्यात बिबट्या आढळला. राक्षे चारचाकीने चालले असताना घराजवळील गोठ्यात त्यांना निवांत विसावलेला बिबट्या दिसला. त्यांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात राक्षे यांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली.
पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. काही भागात हे बिबटे मानवी वस्तीत शिरून लहान मुलांवर हल्ला करत असल्याच्या बातम्याही प्रकाशित होत आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून केले जात आहे.
मावळ व खेड तालुक्यात बिबट्याचे दर्शन काही नवीन नाही. याआधी अनेक वेळा अनेक ठिकाणी बिबट्या नागरी वस्तीत आढळून आला आहे. काही ठिकाणी सतर्क नागरिकांनी या बिबट्याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे. तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरात हे बिबटे कैद झाले आहेत. मावळ तालुक्यात साळुंबे परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते. या उसाच्या शेतात बिबट्यांचा मुक्त वावर सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी गोडुंबरे गावात तीन बिबटे दिसल्याची
माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत सुदुंबरे गावात बिबट्याचा मुक्त वावर असल्याच्या बातमीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच शिरगाव येथेसुद्धा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मावळातील कुसगाव, शिरगाव, चांदखेड बेबडओहळ, पाचाने, पुसाणे, साळुंबे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा अनेक खुणा सापडल्या आहेत. अनेक ठिकाणी या बिबट्यांच्या हल्ल्यात शेळ्या, कुत्रे, कोंबड्या भक्ष बनले आहेत. त्यामुळे वनविभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या बिबट्यांना पकडण्यासाठी काही ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
भक्षाच्या शोधात रात्रीच्या वेळी शक्यतो हे बिबटे ऊस व भात शेतीच्या आडोशाने मानवी वस्तीत प्रवेश करीत आहेत. रात्रीच्या वेळी कोणीही एकटे घराबाहेर पडू नका. बाहेर जाताना समूहाने बाहेर पडावे. सोबत टॉर्च, काठी घ्यावी. मोबाईलमध्ये मोठ्याने गाणी लावावीत आपल्या घरातील लहान मुले, शेळ्या, कुत्रे, कोंबड्या यांची विशेष काळजी घ्यावी. तरीही काही समस्या जाणवल्यास हॅलो फॉरेस्ट 1926 या टोल फी क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रकाश शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ, पुणे विभाग
मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. कुठे बिबट्या आढळल्यास कधीही त्याचा पाठलाग करू नये; कारण तो फिरून हल्ला करू शकतो. बिबट्या दिसल्यास जोरजोरात ओरडा करावा. जेणेकरून बिबट्या घाबरून पळून जाईल. बिबट्या दिसल्यास खाली वाकू नये, खाली वाकल्यास बिबट्या हमला करू शकतो. रात्री घराबाहेर एकट्याने झोपू नये. कोणत्याही प्रकारे बिबट्याला जखमी करू नये. जखमी बिबट्या अधिक धोकादायक बनू शकतो. बिबट्या आढळल्यास नजीकच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेस याबाबत त्वरित कळवावे.
नीलेश गराडे, संस्थापक वन्यजीव रक्षक, मावळ