पिंपरी: निवडणुका आल्या की समोरच्यांना कंंठ फुटतो. सांगायला एकही विकासकाम नसल्याने निवडणुकीची चर्चा विकासावरुन वादावादीमध्ये झाली पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न आहे. आपले काम बोलत असल्याने त्यांचा वैताग आणि रागराग होत आहे. ते रागावले म्हणून रागावू नका, पिंपरी-चिंचवडमध्ये आपण इतके मोठे काम केले आहे; ते सांगितले की कोणालाही उत्तर देण्याची वेळ येणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांनी आपली भूमिका मांडली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन भाजप आमदार महेश लांडगे यांना लक्ष्य केल्यानंतर आमदार लांडगे यांनी एकेरी भाषेत अजित पवारांचा उल्लेख केला होता. यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले होते. या पार्श्वभूमीवर शनिवार (दि. 10) पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथे झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.
आपल्या कामांमुळेच त्यांचा रागराग!
परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पर बोलते हैं, वही लोग रहते हैं खामोश अक्सर, जमाने में जिनके हुनर बोलते हैं! ही शायरी सांगत त्यांनी भाजप नेत्यांना निवडणूक काळात संयम ठेवून आपली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा सल्ला दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये केलेल्या विकासकामांचा पाढा वाचताना फडणवीस म्हणाले की, ‘आपलं काम बोलतंय’ आणि या कामामुळेच समोरच्यांकडून वैताग आणि रागराग सुरू आहे.
ते रागवले म्हणून तुम्ही रागावू नका. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात. त्याची उत्तरे नसल्याने या निवडणुकीची चर्चा विकासावरुन वादावादीमध्ये झाली पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे इतके मोठे काम पिंपरी-चिंचवडमध्ये आपण केले आहे ते सांगितले की कोणालाही उत्तर देण्याची वेळ येणार नाही, असेही ते म्हणाले.
..त्यांच्यावर बोलण्याची माझी कुवत नाही : आ. लांडगे
अजित पवार यांचे नाव न घेता आमदार महेश लांडगे म्हणाले की, ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या पदावर महायुतीचा घटक म्हणून काम करीत आहेत. त्यांच्यावर बोलण्याची मी माझी कुवत समजत नाही; मात्र माझ्यावर कायम शिंतोडे उडवून त्यांनी भाजपला चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांशी माझे जमते असे सांगून आपल्यावरील आरोप लपवून ठेवले. त्यामुळे माझ्यावर झालेल्या आरोपांवर मी मागच्या सभेत उत्तर दिले आहे. महायुतीमधील नेत्यांचा आदर-सन्मान फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांनीच करायचा का, असा सवाल लांडगे यांनी या वेळी उपस्थित केला.