Indrayani River Pollution Pudhari
पिंपरी चिंचवड

Indrayani River Pollution: देहूगाव इंद्रायणी नदी अस्वच्छतेच्या विळख्यात; वारकऱ्यांची गैरसोय

जलपर्णी व कचऱ्यामुळे स्नान करणे कठीण; घाट स्वच्छ करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी, प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्यांचा साठा झाल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे वारकरी, भाविकांना स्नानासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वारकऱ्यांमध्ये नाराजी

राज्याच्या विविध भागांतून हजारो वारकरी, भाविक दररोज देहूत येत असतात. इंद्रायणीच्या पवित्र पाण्यात स्नान करूनच दर्शनासाठी जाण्याची परंपरा आहे. मात्र, सध्या घाटावरील पायऱ्यांजवळ साठलेल्या जलपर्णीच्या ढीगामुळे भाविकांना स्नान करणे कठीण झाले आहे. पहाटे स्नानासाठी येणाऱ्या अनेकांना पाण्यातील जलपर्णी तसेच काठावर साचलेले ढीग पाहून माघारी फिरावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लाखो रुपयांचा खर्च पाण्यात

देहू नगरपंचायतीकडून दरवर्षी जलपर्णी काढण्यासाठी लाखो रुपयांचे टेंडर काढून खर्च केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात जलपर्णीची परिस्थितीत जैसे थी दिसत आहे. नदीकाठावर ठिकठिकाणी काढलेल्या जलपर्णीचे ढीग दिसून येत असल्याने हा खर्च नेमका कुठे जातो?, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

घाट परिसर स्वच्छ करण्याची मागणी

अस्वच्छतेमुळे वारकरी, भाविकांची इंद्रायणी नदीत स्नान करण्याची धार्मिक भावना बाधित होत असून, नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच, देहू नगरपंचायतीच्या कचऱ्याच्या गाड्यादेखील घाटावरचा लावल्या जातात. त्यामुळे या घाटावर कमालीची दुर्गंधी सुटलेली असते. दशक्रिया विधी किंवा इतर काही कार्यक्रम नदीच्या घाटावर केले जातात. अशावेळी जेवणाच्या पंगतीदेखील बसल्या जातात.

मात्र, या कचऱ्याच्या गाड्यांपासून सुरणार्या दुर्गंधीमुळे अनेकजण काढता पाय घेत आहेत. संबंधित प्रशासनाने तातडीने जलपर्णी काढून टाकावी, काठावर साचलेले ढीग हटवावेत आणि घाट परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी नागरिक व भाविकांकडून होत आहे. घाट परिसर स्वच्छ झाल्यास वारकरी, भाविकांना पवित्र स्नानाचा आनंद घेता येईल आणि देहूची धार्मिक परंपरा अधिक सन्मानाने जपली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT