देहूगाव: देहूगावातील बाजारपेठेत मंगळवार व शुक्रवार भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा बाजार कायमस्वरूपी गायरणाच्या जागेत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव देहू न.पं. च्या विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. बाजार स्थलांतरित झाल्यास देहूतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता असून, वारकरी-भाविकांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बाजारामुळे कोंडी
देहूगावात मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस आठवडे बाजार भरतो. याच दिवशी देहू-आळंदी रस्त्यावरही बाजार भरत असल्याने दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होते. बाजारासाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था नसल्याने ग्राहकांकडून दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्याकडेला उभी केली जातात. भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी वाहनचालक दीड ते दोन तास बाजारात थांबत असल्याने रस्त्यावरील वाहतुकीवर त्याचा थेट परिणाम होतो.
रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग
त्यातच सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते आठ या वेळेत एमआयडीसी, आयटी कंपन्या तसेच विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. पीएमपीच्या बसेसचीही वर्दळ असते. बाजारातील गर्दी, रस्त्याच्याकडेला उभी केलेली वाहने आणि वाढती वाहनसंख्या यामुळे रस्ते अरुंद होऊन बाजाराच्या दिवशी वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडतो.
नगरपंचायतीमध्ये प्रस्ताव मांडण्याची शक्यता
या पार्श्वभूमीवर देहूतील आठवडे बाजार कायमस्वरूपी गायरणाच्या जागेत स्थलांतरित करण्याचा विचार नगरपंचायतीकडून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच देहूनगर पंचायतीच्या मासिक सभेत मांडला जाण्याची शक्यता आहे. आठवडे बाजार गायरणात स्थलांतरित झाल्यास मुख्य रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होऊन देहूच्या मुख्य कमानीला वाहतूक कोंडीच्या विळख्यातून मुक्ती मिळेल. तसेच, वारकरी-भाविकांना मंदिरात दर्शनासाठी विनाअडथळा ये-जा करता येईल. बाजार स्थलांतराच्या निर्णयाला नागरिकांचा मोठा पाठिंबा असल्याचेही बोलले जात आहे. बाजारासाठी स्वतंत्र जागा मिळाल्यास वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच, नागरिक, व्यापारी, वारकरी-भाविकांच्या सोयीचा विचार करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.
मुख्य कमानीला कोंडीचा विळखा
देहूच्या मुख्य कमानी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. मुख्य कमानीपासून परंडवाल चौक, चौदा टाळकरी कमान तसेच देहू-आळंदी रस्त्यावरील तळ्याचा माथा या भागापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहतूक ठप्प झाल्याने वारकरी, भाविक, विद्यार्थी, कामगार आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. वाहतूक सुरळीत करताना रस्ते वाहतूक सुरक्षेच्या पोलिसांचीही मोठी दमछाक होते. बाजाराच्या गर्दीत वाहनाचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद-विवाद होण्याबरोबरच चोरीच्या घटनांनाही संधी मिळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे आठवडे बाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे.