देहूगाव: संत तुकाराम महाराज बीजसोहळ्यानिमित्त देहूनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली असून, मुख्य मंदिरासह वैकुंठस्थान मंदिर आणि गाथा मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. येत्या 5 मार्च रोजी होणाऱ्या वैकुंठगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू देवस्थान संस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सोहळ्यानिमित्त संत तुकाराम महाराज मंदिर तसेच वैकुंठस्थान मंदिर परिसराची स्वच्छता करून मंदिर आतून आणि बाहेरून धुवून चकाचक करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने संपूर्ण परिसर उजळून निघाला असून, भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे, रोषणाईने सजलेल्या मंदिरांचे प्रतिबिंब इंद्रायणी नदीपात्रात उमटताना दिसत आहे. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असून, अनेकजण हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आहेत.
भजन, कीर्तनाचे आयेाजन
दरम्यान, बीजसोहळ्याच्या निमित्ताने देहूनगरीत ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ, भजन आणि कीर्तन आदी कार्यक्रम सुरू आहेत. टाळ-मृदंगाच्या गजराने आणि हरिनामाच्या अखंड निनादाने संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगला आहे. त्यातच मंदिरांना केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे देहूनगरीचे आध्यात्मिक सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
बीजसोहळ्याच्या दिवशी संत तुकाराम महाराजांची पालखी सकाळी दहा वाजता वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान करते. या वेळी मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविकांची गर्दी होत असल्याने पालखी मार्गस्थ होण्यापासून ते पुन्हा मंदिरात आगमन होईपर्यंत संपूर्ण मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये व सोहळा शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने शुक्रवारी (दि. 28) देहूगाव परिसरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या वेळी अप्पर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलिस आयुक्त बसवराज तेली, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्यासह पोलिस अधिकारी व देहू देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.
वाहतूककोंडी टाळण्यासाठी आराखडा तयार
बीजसोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूनगरीत दाखल होणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. वाहतूककोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून, अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा बीजसोहळा निर्विघ्न आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी तयारी करत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
बीजसोहळ्यानिमित्त पोलिस प्रशासनाकडून पाहणी
संत तुकाराम महाराज बीजसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूगावात पोलिस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेची सखोल पाहणी करून आवश्यक नियोजन सुरू केले आहे. लाखो वारकरी, भाविकांच्या उपस्थितीची शक्यता लक्षात घेता पालखी मार्ग, मुख्य मंदिर परिसर तसेच चौदा टाळकरी कमान ते वैकुंठस्थान मंदिर या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.