Dehu Road Accident Hotspot Pudhari
पिंपरी चिंचवड

Dehu Road Accident Hotspot: देहूरोडचा देहू फाटा ठरतोय ‘डेथ स्पॉट’; वारंवार अपघातांमुळे नागरिक संतप्त

सरदार पेट्रोल पंपाजवळ भरधाव वाहनांचा कहर; भुयारी मार्ग, उड्डाणपूल व सिग्नल यंत्रणेची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: पुणे-मुंबई जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड येथील देहू फाटा ते सरदार पेट्रोल पंपाजवळील चौक अपघातांचा हॉट स्पॉट बनला आहे. येथे वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या चौकाने आजवर अनेक निष्पापांचे बळी घेतले असून, अनेकजण गंभीर जखमी होऊन कायमचे अपंग झाले आहेत. यामुळे या भागातील अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभाग व संंबंधित प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

निगडीकडून येणारी वाहने मुंबईकडे तसेच श्रीक्षेत्र देहूकडे वळत असताना तसेच पेट्रोल भरण्यासाठी आणि पेट्रोल भरून निघणारी चारचाकी, दुचाकी वाहनांमुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या चौकात दररोज वाहतूक कोंडी होते. मुंबईकडून येणारी वाहने उतारामुळे भरधाव वेगाने येतात. वेगावर नियंत्रण सुटल्याने वाहनचालकांना ब्रेक लावणे कठीण जाते आणि अपघातांना आमंत्रण मिळते.

परिणामी, येथे सतत लहान-मोठे अपघात घडत असून, अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. दरम्यान, या ठिकाणी पुढे कोणताही अपघात होऊन जीवितहानी किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास संबंधित विभाग जबाबदार राहील. आवश्यक ती उपाययोजना न केल्यास अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करू,” असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.

पादचाऱ्यांच्‍या जीवितास धोका

या चौकातून सरदार पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन परिसर, कॅन्टोन्मेंट कार्यालय, टपाल कार्यालय, संरक्षण विभागाची कॅन्टीन तसेच किन्हईगाव व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. अरुंद रस्ता, वेगवान वाहतूक आणि अपुरी नियंत्रण व्यवस्था यामुळे पादचाऱ्र्यांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत आहे.

पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

अपघातानंतर वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यापूर्वी अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी येथे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल उभारण्याची, सिग्नल यंत्रणा बसविण्याची तसेच वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी करत आंदोलने, रास्ता रोको केले; मात्र संबंधित विभागाकडून केवळ आश्वासनांचीच खैरात करण्यात आली.

सुरक्षा उपाययोजनांची गरज

भक्ती-शक्ती चौक ते देहूरोडदरम्यान रस्ता रुंदीकरण व उड्डाणपूल प्रकल्प राबवण्यात आला असला, तरी देहू फाटा व सरदार पेट्रोल पंप या दोन महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना न झाल्याने अपघातांचे प्रमाण कायम आहे. दुभाजक असतानाही वाहनांचा अनियंत्रित वेग आणि अपुरी सिग्नल व्यवस्था यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT