Dehu Indrayani River Ghat Pudhari
पिंपरी चिंचवड

Dehu Indrayani River Ghat: देहूत इंद्रायणी घाटाची पडझड; भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

पवन धर्मशाळेसमोरील घाटाची वर्षानुवर्षे दुरुस्ती नाही; निसरड्या पायऱ्यांवरून पडून अनेक भाविक जखमी

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: श्रीक्षेत्र देहूगाव येथील मुख्य मंदिर ते पवन धर्मशाळा परिसरादरम्यान इंद्रायणी नदीच्या तीरावर बांधण्यात आलेल्या घाटाचा काही भाग कोसळला असून, अद्याप त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. घाटाचे पडलेले दगड आणि मातीचा ढिगारा तसाच पडून असल्याने परिसराला विद्रूप स्वरूप आले आहे. त्याचबरोबर स्नानासाठी व दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी-भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आळंदी-देहू विकास परिसर समितीच्या वतीने लोकवर्गणीतून २००२ साली इंद्रायणी नदीच्या तीरावर या घाटाची उभारणी करण्यात आली होती. विश्वनाथ कराड यांच्या पुढाकारातून घडीव दगडांचा वापर करून बांधण्यात आलेल्या या घाटामुळे मुख्य मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडली होती. मात्र, १९१४ मध्ये माळीणची घटना घडली, त्या काळात पवन धर्मशाळेसमोरील घाटाचा काही भाग कोसळला होता. तेव्हापासून आजतागायत या पडलेल्या घाटाची पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही.

पाय घसरुन अनेकांना दुखापत

कार्तिकी यात्रेसह वर्षभरात विविध धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने हजारो भाविक देहूत येत असतात. त्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचाही समावेश असतो. इंद्रायणी नदीत स्नानासाठी जाताना घाटावरील पडलेले दगड, निसरड्या पायऱ्या आणि शेवाळ यामुळे भाविकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पाय घसरून पडल्याने अनेक भाविक जखमी झाले असून, काहींना डोक्याला दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या अपघातांमुळे अनेकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला आहे.

दुरुस्तीची मागणी

घाटाच्या दुरवस्थेकडे देहू देवस्थान संस्थान, देहू नगरपंचायत तसेच तालुका व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता संबंधित प्रशासनाने एकमेकांकडे जबाबदारी ढकलण्याऐवजी समन्वय साधून घाटाची तातडीने दुरुस्ती व पुनर्बांधणी करावी, अशी मागणी होत आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या

इंद्रायणी नदीवरील हा घाट वारकरी संप्रदायाच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. येथे दररोज भाविकांची वर्दळ असते. घाटाची पडझड झाल्याने भाविकांना स्नानासाठी जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित विभागाने या घाटाची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी. वारकरी-भाविकांना सुरक्षितपणे स्नान व दर्शन घेता यावे, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी संत तुकाराम महाराजांचे वंशज रायबा मोरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT