देहूगाव: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या देहूनगरीत दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिकांसह वारकरी, भाविक आणि पर्यटक अक्षरशः हैराण झाले आहेत. देहूगावच्या मुख्य कमानीत सकाळी तसेच सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेकदा दोन-दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची वेळ वाहनचालकांवर येत आहे.
नागरिक हैराण
पंढरीचा पांडुरंग आणि तुकोबारायांच्या भक्तीने पावन झालेल्या देहूनगरीत वर्षभर हजारो वारकरी, भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी येतात. मात्र, देहूत प्रवेश करतानाच मुख्य कमानीजवळ वाहतूक कोंडीच्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याने भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. देहूगाव परिसरात कामगारवर्गाची मोठी वस्ती असल्याने सकाळी व सायंकाळी कंपन्यांच्या बसेस, मोटारी तसेच एमआयडीसी व आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहने मोठ्या संख्येने ये-जा करतात. त्यातच स्थानिक वाहतूक, बाजारपेठेतील गर्दी आणि रस्त्याच्याकडेला होणारे वाहन पार्किंग यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे. विशेषतः मंगळवार व शुक्रवार या दिवशी परिस्थिती अधिकच गंभीर होत असून, दिवसभर वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाहतूक पोलिस असतात कुठे?
दररोज ठराविक वेळेत वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलिसांची प्रभावी उपस्थिती का दिसत नाही, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. कोंडी होण्याची ठिकाणे आणि वेळा प्रशासनाला माहीत असतानाही त्याठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी अथवा वेळेनुसार नियोजन का केले जात नाही?, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
भाजी मंडईत पार्किंगचा बोजवारा
देहूगाव-आळंदी रस्त्यावरील भाजी मंडई परिसरात बाजाराच्या दिवशी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात. चालक वाहने रस्त्यावरच लावून बाजारात जात असल्याने या भागात वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो. त्यामुळे सोमवार, मंगळवार तसेच गर्दीच्या बाजाराच्या दिवशी या परिसरात वाहतूक पोलिसांची विशेष नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
या ठिकाणी वाहतूक पोलिसांची गरज
सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ या गर्दीच्या वेळेत देहूगाव मुख्य कमान, देहूगाव तालीम, चौदा टाकळकरी कमान, विठ्ठलनगर येथील काळोखे चौक आणि परंडवाल चौक या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. देहूनगरीत देशभरातून येणाऱ्या वारकरी-भाविकांना कोंडीमुक्त दर्शनाचा अनुभव मिळावा, यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने तातडीने ठोस नियोजन करावे, केवळ कोंडी झाल्यानंतर पोलिसांची धावपळ करण्यापेक्षा कोंडी होण्याच्या वेळा व ठिकाणे निश्चित करून त्यानुसार वाहतूक नियंत्रणाचे नियोजन करावे, अशी अपेक्षा वाहनचालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.