उर्से मावळ: गोपाळकाला अर्थात दहीहंडीचा उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. परिसरातील कुंभारवाड्यात दहीहंडीसाठी मातीच्या हंड्या तयार करण्याची लगबग सुरू आहे. कारागिरांकडून हंड्यांवर आकर्षक रंगरंगोटी आणि कलाकुसरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी परिसरातील कारागिरांनी मोठी तयारी केली आहे. जवळपास १५० ते २०० मातीच्या हंड्या तयार करून ठेवल्या आहेत. अनेक दिवसांपासून माती मळणे, आकार देणे, वाळवणे, भट्टीत भाजणे आणि त्यानंतर रंगरंगोटी करणे, अशी प्रक्रिया करून या हंड्या तयार केल्या जातात. प्रत्येक हंडीमागे कारागिरांची अनेक तासांची मेहनत आणि कौशल्य असते.
सणाला अवघे चार दिवस शिल्लक असल्यामुळे दहीहंडी मंडळांकडून तसेच शाळकरी मुलांकडून हंडी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा हंड्यांचे बुकिंग चांगले झाल्याचे कारागिरांनी सांगितले. सध्या उर्से मावळ परिसरातील बाजारात 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत विविध आकार आणि प्रकारच्या मातीच्या हंड्या उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, यंदा उत्पादन खर्च वाढला असतानाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हंड्यांच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याचे कारागिरांनी सांगितले.
खर्चात वाढ
माती, रंग, इंधन आणि वाहतूक यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यातच हंड्या तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनतही खर्च होते. मोठ्या प्रमाणावर हंड्या तयार करून ठेवल्यानंतर त्यांची विक्री झाली नाही, तर गुंतवलेले मूळ भांडवलही अडकून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंभारवाड्यातील कारागिर आसपासच्या बाजारपेठेत जावून याची विक्री करत आहेत.
स्थानिक कुंभारांकडून हंड्या खरेदी करण्याची मागणी
दहीहंडी उत्सवात पारंपरिक मातीच्या हंड्यांना विशेष महत्त्व आहे. आधुनिक काळात सजावटीच्या आणि इतर पर्यायांचा वापर वाढत असला, तरी पारंपरिक मातीची हंडी ही उत्सवाची ओळख मानली जाते. त्यामुळे दहीहंडी मंडळांनी आणि नागरिकांनी स्थानिक कुंभारांकडून मातीच्या हंड्या खरेदी केल्यास या पारंपरिक व्यवसायाला हातभार लागेल, अशी अपेक्षा कारागिरांकडून व्यक्त होत आहे. यंदाच्या दहीहंडीच्या हंगामातून अपेक्षित उत्पन्न मिळणार का, हा प्रश्न सध्या कुंभारवाड्यातील कारागिरांसमोर उभा आहे.
हंड्या तयार करण्यासाठी जास्त मेहनत लागते. गेल्या वर्षी सणाच्या तुलनेत यंदा चांगली मागणी आहे. यंदा हंडी तयार करण्यासाठी माती, रंग, इंधन आणि वाहतूक यासाठी मोठा खर्च करावा लागला. त्यामुळे याची चांगली विक्री व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.भाऊसाहेब दत्तात्रेय कुंभार, परंदवडी कारागीर