संतोष शिंदे
पिंपरी: सायबर गुन्ह्यांचा तपास करताना देशभरातील पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून संशयित व्यवहाराशी संबंधित बँक खाती सरसकट फ्रीज केली जात असून, त्याचा फटका अनेक सर्वसामान्य खातेधारकांना बसत असल्याचे चित्र समोर येत आहे. सायबर चोरट्यांकडून तपासाची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या अनोळखी बँक खात्यांमध्ये छोट्या रकमा पाठवल्या जात आहेत. त्यानंतर तपासाच्या लेअर सिस्टिममध्ये ही खाती आल्याने संबंधित नागरिकांची बँक खातेही फ्रीज केली जात असून, त्यांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प होत आहेत.
सायबर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांकडून लेअर पद्धतीने तपास केला जातो. ज्या खात्यावर थेट फसवणुकीची रक्कम जमा होते ते लेअर-1 खाते समजले जाते. त्या खात्यातून पुढे ज्या खात्यावर पैसे वर्ग होतात ते लेअर-2, त्यानंतरचे लेअर-3 आणि पुढील व्यवहारांनुसार इतर खाती तपासाच्या कक्षेत येतात. या साखळीत आलेली अनेक खाती खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरती फ्रीज केली जातात. मात्र, अलीकडे सायबर चोरट्यांनी पोलिसांचा तपास गुंतागुंतीचा करण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे.
काही गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून वेगवेगळ्या सामान्य नागरिकांच्या खात्यांमध्ये पाचशे किंवा हजार रुपयांसारख्या छोट्या रकमा पाठवल्या जात आहेत. संबंधित खातेधारकांचा मूळ फसवणुकीशी कोणताही संबंध नसतो. मात्र, तपासाच्या प्रक्रियेत त्यांचे खाते संशयित व्यवहारांच्या साखळीत आल्याने तेही फ्रीज केले जाते. अचानक खाते फ्रीज झाल्याने नागरिक सुरुवातीला बँकेत धाव घेतात. त्या वेळी खात्यात अनोळखी व्यक्तीकडून आलेली छोटी रक्कम आणि त्याच कारणामुळे खाते फ्रीज झाल्याचे त्यांना समजते.
नागरिकांना मानसिक त्रास
सायबर विभागाकडे अर्ज दिल्यानंतर संबंधित माहिती ज्या राज्यातील पोलिस किंवा तपास यंत्रणेकडून खाते फ्रीज करण्यात आले आहे. त्यांच्याकडे पाठवली जाते. तपास अधिकाऱ्याची खात्री पटल्यानंतर खाते अनफ्रीज करण्याबाबत सूचना दिल्या जातात. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित खातेधारकांना मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. सायबर गुन्हेगारांच्या नव्या शक्कलीमुळे आता सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्या बँक व्यवहारांबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
खाते फ्रीज झाल्यास नागरिकांनी काय करावे?
बँक खाते अचानक फ्रीज झाल्यास घाबरून न जाता प्रथम संबंधित बँकेकडून खात्यावर कोणत्या व्यवहारामुळे निर्बंध आले याची माहिती घ्यावी. त्यानंतर संबंधित व्यवहाराचा तपशील, बँक स्टेटमेंट, ओळखपत्र आणि अर्जासह जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात किंवा राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करावी. अनेक नागरिकांकडून तक्रार दाखल करण्यास उशीर केला जातो. त्यामुळे खाते अनफ्रीज होण्यास अधिक वेळ लागतो. खात्यात आलेल्या अनोळखी रकमांची माहिती वेळोवेळी तपासणे, एसएमएस आणि ई-मेल अलर्ट सुरू ठेवणे, तसेच संशयास्पद व्यवहार दिसताच त्वरित बँकेशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
म्युल अकाउंटचा वाढता वापर
सायबर गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून म्युल अकाउंट अर्थात इतरांच्या नावावरील बँक खात्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. काही वेळा पैशांचे आमिष दाखवून नागरिकांची खाती वापरली जातात. तर, काही वेळा खातेदारांच्या नकळत व्यवहार घडवले जातात. फसवणुकीतील रक्कम अनेक खात्यांतून फिरवल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा होतो. विशेषतः विद्यार्थी, बेरोजगार तरुण आणि लहान व्यावसायिकांची खाती वापरली जात असल्याचे अनेक तपासांत समोर आले आहे. अनेकांना त्यांचे खाते गुन्ह्यात वापरले जात असल्याची कल्पनाही नसते.
छोट्या व्यवहारांकडे दुर्लक्ष धोकादायक
मोबाईल रिचार्ज, कॅशबॅक किंवा ऑनलाईन व्यवहार समजून अनेक नागरिक खात्यात आलेल्या 500 किंवा हजार रुपयांच्या रकमेकडे दुर्लक्ष करतात. मात्र, सायबर गुन्हेगारांकडून याच पद्धतीचा वापर करून तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे काही प्रकरणांमध्ये खातेदारांना व्यवहाराची माहिती अनेक दिवस होत नाही. त्यामुळे नियमितपणे बँक पासबुक, मोबाईल बँकिंग व्यवहार आणि एसएमएस अलर्ट तपासणे आवश्यक ठरत आहे. अनोळखी खात्यावरून रक्कम जमा झाल्यास ती खर्च न करता त्वरित बँकेला लेखी माहिती देणे सुरक्षित मानले जात आहे.
सायबर फसवणुकीतील पैशांचा प्रवाह शोधण्यासाठी संबंधित खात्यांची तपासणी करावी लागते. खबरदारीचा उपाय म्हणून काही खाती तात्पुरती फ्रीज केली जातात. नागरिकांनी खात्यातील अनोळखी व्यवहार तातडीने बँक व सायबर पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावेत.रविकिरण नाळे, पोलिस निरीक्षक, सायब पोलिस ठाणे