पिंपरी: चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिराजवळ संकष्टी चतुर्थीनिमित्त भरणाऱ्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू विक्रीसाठी आल्याचा दावा एका महिलेने केला आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चिंचवड पोलिस ठाण्यांतर्गत एक पथक तपासासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
व्हिडिओमध्ये संबंधित महिला यात्रेतून खरेदी केलेली चादर दाखवत आहे. चादर धुतल्यानंतर तिच्या एका कोपऱ्यात लपविण्यात आलेले लेबल आढळल्याचे ती सांगते. त्या लेबलवर मेड इन पाकिस्तान असा उल्लेख असल्याचा दावा तिच्याकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर स्थानिक बाजारपेठांमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यात्रेत आणि रस्त्यावरील स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंची तपासणी होते का?, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
व्हिडिओमध्ये संबंधित महिलेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशात पाकिस्तानी वस्तूंवर विविध प्रकारचे निर्बंध असताना अशा वस्तू स्थानिक बाजारात पोचतातच कशा?, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काहींनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिच्यावरील उत्पादन तपशील, उत्पादक कंपनीचे नाव आणि मूळ देश याची खात्री करावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी संबंधित वस्तू नेमकी कुठून आली, ती अधिकृतपणे आयात झाली होती की नाही, तसेच विक्रेत्याची बाजू काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
संबंधित प्रकाराबाबत आम्ही विशेष काळजी घेत आहोत. तपासासाठी एक स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडूनदेखील ही चादर विक्री करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. याबाबत कोणाकडे अधिक माहिती असल्यास नजिकच्या पोलिसांशी संपर्क करावा.रणजीत जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे), चिंचवड पोलिस ठाणे