Children Safety Pudhari
पिंपरी चिंचवड

Children Safety On Two Wheelers: मुलांचे लाड करताना जीवाशी खेळ नको! दुचाकीवर उलटे बसवणे ठरू शकते धोकादायक

शाळेत नेताना पालकांकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष; अचानक ब्रेक किंवा वाहनाचा तोल गेल्यास अपघाताचा धोका

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहरातील विविध शाळांच्या परिसरात मुलांना दुचाकीवरून शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांकडून वाहतुकीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही पालक दुचाकी चालवत असताना त्यांची मुले मागील सीटवर विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेली दिसतात.

पालकांचे लक्ष रस्त्याकडे असते, तर मुलांचे तोंड मागील बाजूला असते. मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकतो. मुलांचे लाड करताना त्यांच्या जीवाशी खेळ तर होत नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मुलांच्या सुरक्षेपेक्षा लाड महत्त्वाचे?

शाळेत जाताना किंवा शाळा सुटल्यानंतर घरी परतताना मुलांना दुचाकीवर बसवण्याची घाई पालकांना असते. मात्र, या घाईत मुलांना योग्य पद्धतीने बसवले आहे का, त्यांचा तोल सांभाळला जात आहे का आणि प्रवास सुरक्षित आहे का, याकडे दुर्लक्ष होताना दिसते. काही पालक मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांना दुचाकीवर उलटे बसू देतात. मुलांना हा प्रकार गंमतीचा वाटत असला, तरी रस्त्यावरील वाहतूक, अचानक लागणारा ब्रेक किंवा वाहनाचा तोल जाणे यामुळे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पालकांनी जबाबदारी ओळखावी

मुलांवर प्रेम करणे आणि त्यांचे लाड करणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करून केलेले लाड कधीही योग्य ठरू शकत नाहीत. शाळा प्रशासन, वाहतूक पोलिस आणि पालकांनी एकत्रितपणे या प्रकाराबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. मुलांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व समजावून सांगणे आणि नियमांचे पालन करणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. मुलांचा हट्ट काही क्षणांचा असतो; मात्र निष्काळजीपणाचे परिणाम आयुष्यभराचे ठरू शकतात. त्यामुळे पालकांनो, मुलांचे लाड जरूर करा; पण त्यांच्या जीवाशी खेळणारा हा लाड बरा नव्हे!

अपघाताचा धोका वेळीच सावध होण्याची गरज

दुचाकीवर विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेल्या मुलाला रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज घेणे कठीण होते. अचानक ब्रेक लागल्यास किंवा वाहनाला धक्का बसल्यास मुलाचा तोल जाऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या अशा हट्टाला प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना सुरक्षितपणे बसण्याची सवय लावणे आवश्यक आहे. हेल्मेटचा वापर, योग्य बैठक आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन याबाबतही पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT