Dispute Pudhari
पिंपरी चिंचवड

Chikhali Fight Case: चिखलीत लघुशंकेच्या वादातून दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल, दोघांना अटक

पूर्णानगर परिसरातील घटनेत लोखंडी रॉड, दगड आणि धारदार शस्त्रांचा वापर; दहशत निर्माण केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: चिखलीतील पूर्णानगर येथे लघुशंकेच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटांतील हाणामारीत झाले. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिल्याने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन्ही बाजूंकडील प्रत्येकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. १) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

अभिषेक प्रकाश घनघाव (२६, रा. डिफेन्स कॉलनी, चिखली) यांच्या फिर्यादीवरून आकाश कसबे, आयुष ज्ञानेश्वर फडतरे आणि त्यांच्या इतर सहा ते सात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आकाश कसबे याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र दारू पिऊन घरी जात असताना त्यांच्यातील एक जण लघुशंका करत होता. त्यावरून झालेल्या वादानंतर आरोपींनी इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी फिर्यादीला दुचाकीवरून जाण्यापासून रोखून शिवीगाळ व मारहाण केली. एका आरोपीने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या पायावर आणि डोक्यात वार करून जखमी केले. तसेच फिर्यादीच्या मित्राला खाली पाडून दगड, रॉड आणि धारदार शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केले. हवेत शस्त्रे फिरवून परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, आकाश विलास कसबे (२६, रा. सोमाटणे गाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुप्रिम राजू काळे (२५, रा. शंकरनगर, चिंचवड), साहिल भिसे (२३, रा. रामनगर, चिंचवड) आणि अभिषेक प्रकाश घनघाव (२६, रा. चिंचवड) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक घनघाव याला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी व त्यांचे मित्र उभे असताना आरोपी रस्त्याच्या कडेला लघवी करत होता. त्यामुळे दुचाकीवर शिंतोडे उडाल्याने "येथे लघुशंका करू नका," असे सांगितल्याचा राग आरोपींना आला. त्यातून झालेल्या वादात आरोपीने धारदार शस्त्राने फिर्यादी व त्यांच्या मित्राच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच दुसऱ्या आरोपीने दगड मारत हवेत धारदार शस्त्र फिरवून परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT