चऱ्होली: मागील काही दिवसांपासून चऱ्होली परिसरात बिबट्यांचे दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे नागरिक रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडायला घाबरत आहे. आतापर्यंत बिबट्यांनी अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला असल्यामुळे नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
उसाच्या शेतीत बिबट्या
काही दिवसांपूर्वी गावाच्या सीमेवर दिसणारा बिबट्या शेत शिवारात दिसू लागला होता. आता तर गावातील रस्त्यांवर आणि अंगणातदेखील बिबट्याने दस्तक द्यायला सुरुवात केली, आहे. चऱ्होली गावाची भौगोलिक रचना बघता चऱ्होली गावाच्या सर्व वाड्या या शेतीच्या सानिध्यात आहेत. माळीपेठा, बुर्डेवस्ती, भोसलेवस्ती, पठारेमळा, चोवीसावाडी, वडमुखवाडी, कोतवालवाडी, काळजेवाडी दाभाडेवस्ती, दत्तनगर, ताजणे मळा, वाघेश्वरवाडी या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेती आहे. शिवाय काही ठिकाणी ओढ्यांचे देखील अस्तित्व आहे. काही ठिकाणच्या रस्त्यांचे अर्धवट काम झाले असल्यामुळे अशा रस्त्यांवरून वाहतूक सुरू झाली नाही. त्यामुळे अजूनही कित्येक ठिकाणी मानवी वस्तीपासून जवळच मोठ्या प्रमाणावर माणसांची वर्दळ नसते. त्यामुळे बिबट्याला नैसर्गिक अधिवासात राहता येते. मोठया प्रमाणावर ऊसशेती असल्यामुळे बिबट्याला मानवी वस्तीच्या एकदम जवळ लपायला मोठ्या प्रमाणावर जागा आहे. त्यामुळेच पूर्वी नदीच्याकडेला दिसणारा बिबट्या आता चऱ्होलीच्या अंतर्गत भागात दिसू लागला आहे.
पाळीव प्राण्यांवर हल्ले
चऱ्होलीत कित्येकांच्या कोंबड्या, पाळीव कुत्रे, दुभती जनावरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. 24 तास भीतीचे सावट माणसांच्या मनामध्ये घर करून आहे. नागरिकांना दररोजचे जीवन व्यवहार करणेदेखील अवघड झाले आहे. कधी कोणाच्या अंगणात बिबट्या अवतरेल याचा नेम राहिला नाही. दररोज बिबट्या कोणत्या ठिकाणी दिसेल याची कुठलीच शाश्वती राहिली नाही. काही दिवसांपूर्वी शेत शिवारात नदीच्या काठावर दिसणारा बिबट्या आता अंगणात दिसू लागला त्यामुळे नागरिकांना जीविताची भीती वाटत आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी लावला पिंजरा
चऱ्होलीत आतापर्यंत तनिष ऑर्चिड रोड, राही कस्तुरी सोसायटी, पठारे मळा, वडमुखवाडी, काळजेवाडी, डीपी रोड, तापकीर वस्ती तसेच शेतात बिबट्या आढळला आहे. वन परिमंडळ अधिकारी शितल खेंडके, वनाधिकारी अशोक गायकवाड यांनी पिंजरा लावला आहे. मात्र, आतापर्यंत बिबट्याला पकडण्यात यश आले नाही.
पिंजरा कुत्र्यासाठी की बिबट्यासाठी
कळकीच्या विहिरीपासून पुढे गेल्यावर काळजेवाडीच्या ओढ्याजवळ वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, या पिंजऱ्यामध्ये कोंबडी ठेवली असल्यामुळे या पिंजऱ्यात कुत्री जातात आणि पिंजरा बंद होतो. दिवसा पिंजरा बंद असतो. मग वनाधिकाऱ्यांना समजल्यावर वन अधिकारी संध्याकाळी कुत्र्याला बाहेर काढून पिंजरा उघडतात. म्हणजे दिवसा पिंजरा बंद आणि रात्री उघडलेला असतो.