चऱ्होली: पाणी म्हणजे जीवन. अगदी प्राचीन काळापासून पाण्यानेच चराचरसृष्टीला जीवन बहाल केले आहे. पण आता हेच पाणी जलचरांसाठी धोकादायक बनले आहे. चऱ्होली येथील बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी फेसाळल्याने नदीतील जलचर मृत पावले आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
लोणावळ्यात उगम पावून तुळापूरमध्ये भीमा-भामेला मिळेपर्यंत इंद्रायणी नदीचा प्रवास जसा देहू-आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रांच्या सानिध्याने होतो, तसाच विविध प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रातून होत आहे. त्यामुळे साहजिकच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणचे सर्व निर्माल्य, कुंकू, गुलाल, बुक्का यांसह पत्रावळ्या, टाकून दिलेले अन्नपदार्थ त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रकारची रसायने स्क्रॅप मटेरियल नदीच्या पाण्यात मिसळत असल्यामुळे एकूण संपूर्ण इंद्रायणी नदीच प्रदूषित झाली आहे.
या रसायनमिश्रित पाण्यामुळे पाण्यातील प्राणवायूची पातळी खालावल्याने जलचरांचा मृत्यू होत आहे. पूर्वी ज्या वेळेला औद्योगीकरण झाले नव्हते, त्या वेळी नदीतील माशामुळेच नदीचे पाणी स्वच्छ राहत असे. पण जसजसे औद्योगीकरण होत गेले तसतसे पाणी इतके प्रदूषित झाले की, त्यामुळे माशांचा मृत्यू ओढवलाच पण मासे खाणाऱ्या बगळ्यांचादेखील मृत्यू ओढवला.
मृत जलचरांमुळे परिसरात दुर्गंधी
चऱ्होलीच्या केटी बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर खारफुटीची वनस्पती अडकलेली आहे. त्यामुळे मृत झालेले मासे आणि या माशांना खाऊन मृत अवस्थेत पडलेले बगळेदेखील या ठिकाणी बंधाऱ्याला अडकत आहेत. सर्वत्र मृत माशांचा खच पडल्यामुळे आणि नदीच्या कडेला बगळेदेखील मरून पडल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. चऱ्होलीत औद्योगिक क्षेत्र नाही, मात्र औद्योगिक क्षेत्रातून येणारी नदी रसायनमिश्रित पाण्यामुळे दूषित होत आहे आणि त्याचे परिणाम मात्र चऱ्होलीकरांना भोगावे लागत आहेत.
दूषित पाण्यातही मासेमारी सुरूच
पाण्यावर मोठ्या प्रमाणात रसायनांचा तवंग येत आहे. अशाच रसायनमिश्रित पाण्यामध्ये जीव धोक्यात घालून मच्छिमारबांधव मासेमारी करीत आहेत. या केमिकलयुक्त पाण्यामुळे मानवी जीवन धोक्यात येण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने या विषयाकडे लक्ष द्यावे. रसायनमिश्रित पाण्यात मृत पावलेले मासे जर नागरिकांच्या आहारात आले तर नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. हा अत्यंत गंभीर प्रश्न असून याकडे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी अत्यंत गांभीर्याने बघण्याची गरज आहे.
केमिकलयुक्त मृत मासे खाल्ल्याने जर बगळे मरत असतील तर इतर पक्ष्यांच्या जीवालादेखील मोठा धोका आहे. त्याचप्रमाणे माणसांच्या आहारात जर असे मासे आले तर मानवी आयुष्यदेखील धोक्यात येऊ शकते. या समस्येकडे प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.स्थानिक नागरिक