Charholi Road Potholes Pudhari
पिंपरी चिंचवड

Charholi Road Potholes: चऱ्होली दत्तनगरमधील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे; नागरिकांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पावसाळा संपून दोन महिने उलटले तरी रस्त्यांची अवस्था बिकट; शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

चऱ्होली: पावसाळा संपून दोन महिने झाले तरीही चऱ्होलीतील दत्तनगर परिसरातील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे-आळंदी पालखी मार्गावरून पुण्याकडून आळंदीकडे जाताना चऱ्होली फाटा येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातून डाव्या बाजूला वळले असता दत्तनगर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्याला सुरुवात होते. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. परिसरात हॉटेल, बांधकाम व्यवसायाच्या विविध साईट्‌‍स आहेत. त्यामुळे सतत स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वर्दळ असते. तरीही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अपघाताची भीती

दत्तनगर परिसरात एक शाळा आहे. त्यामुळे याच रस्त्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. एकतर पक्का डांबरी रस्ता नाही, शिवाय मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत आणि रस्त्याला दुभाजकही नाही. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. हा रस्ता एकेरी रस्ता असून, रस्त्याच्या एकूण रुंदीच्या अर्धा रस्ता खड्ड्‌‍याने व्यापलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत धोकादायक परिस्थितीत प्रवास करावा लागतो. कित्येक लहान मुलांना सोडवायला त्यांचे पालक येत असल्यामुळे त्यांनादेखील याच रस्त्याने लहान मुलांना दुचाकीवर घेऊन प्रवास करणे अत्यंत जिकीरीचे होत आहे.

लवकर रस्ता दुरुस्तीची मागणी

पावसाळा सुरू असल्यामुळे प्रशासनाला खड्डे बुजवायला अडचण येत होती. मात्र, आता पावसाळा संपूनही दोन महिने उलटले तरीही महापालिकेचा स्थापत्य विभाग जाणूनबुजून खड्ड्‌‍यांकडे दुर्लक्ष करत आहे, अशी भावना परिसरातील नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी चांगला करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिकेला रस्त्याच्या जागेचा ताबा मिळालेला नाही. त्यामुळे रस्ता तयार करण्यात अडचणी येत आहेत. जेव्हा ताबा मिळेल त्यावेळी पूर्ण रस्ता तयार करण्यात येईल.
अमित चव्हाण, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT