Maval Black Crab Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Black Crab: पावसाळा आला अन् मावळ-मुळशीत काळ्या खेकड्यांची ‘जत्रा’; खवय्यांची गर्दी, कातकरी बांधवांना रोजगार

खेकड्याच्या रश्श्याला वाढली मागणी; एका वाट्याला ४०० ते ६०० रुपये भाव, पारंपरिक व्यवसाय ठरतोय कातकरी कुटुंबांचा आधार

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: पावसाळ्याच्या सरी कोसळताच मावळ आणि मुळशी तालुक्यातील डोंगरदऱ्या, ओढे, नाले आणि भातशेती परिसरात काळ्या खेकड्यांची रेलचेल सुरू झाली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह परिसरातील खवय्ये मोठ्या संख्येने या भागाकडे धाव घेत आहेत. काळ्या खेकड्याच्या रश्श्याची चव आणि वाढलेली मागणी यामुळे या भागात आखाड चांगलाच रंगला असून कातकरी समाजातील अनेक कुटुंबांसाठी हा व्यवसाय आर्थिक आधार ठरत आहे.

मावळ आणि मुळशीतील कातकरी बांधव पिढ्यान्‌पिढ्या पारंपरिक पद्धतीने खेकडे पकडण्याचे काम करतात. पहाटे, सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी ते टॉर्च, बांबूच्या काठ्या आणि साध्या हातातील उपकरणांच्या मदतीने भातशेती, ओढे, नाले, डोंगरपायथा तसेच पाणथळ भागातील बिळांचा शोध घेतात. खेकड्यांच्या हालचाली, बिळांची रचना आणि पाण्याचा अचूक अंदाज असल्याने त्यांना शिकार सहज सापडते.

काही ठिकाणी बिळात बारीक काडी किंवा लोखंडी सळी घालून खेकड्याला बाहेर काढले जाते, तर काही वेळा तो अन्नाच्या शोधात बाहेर येण्याची वाट पाहिली जाते. बाहेर पडताच चिमट्यापासून बचाव करत कौशल्याने त्याला पकडले जाते. पकडलेले खेकडे बांबूच्या टोपल्या, जाळीच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या क्रेटमध्ये जिवंत ठेवले जातात. त्यानंतर पहाटेच ते गावातील बाजारपेठा, रस्त्यालगतची विक्री केंद्रे तसेच थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात. अनेक नियमित ग्राहक आगाऊ मागणी नोंदवून ठेवतात. सुट्टीच्या दिवशी विक्रीचा जोर अधिक वाढत असून अनेक ठिकाणी सकाळच्या काही तासांतच संपूर्ण माल संपत असल्याचे विक्रेते सांगतात.

काळे खेकडे खाताहेत भाव

दरवर्षीप्रमाणे यंदाही काळ्या खेकड्यांना चांगला बाजारभाव मिळत असून आकारानुसार एका वाट्याची किंमत साधारण ४०० ते ६०० रुपयांदरम्यान आहे. एका वाट्यात साधारण सहा खेकडे असतात. मोठ्या आकाराच्या खेकड्यांसाठी ग्राहक अधिक पैसे मोजण्यासही तयार असतात. त्यामुळे सकाळी विक्रीसाठी आलेले चांगल्या दर्जाचे काळे खेकडे काही वेळातच संपून जातात. पावसाळ्यात खेकड्याच्या रश्श्याला विशेष मागणी असल्याने स्थानिक हॉटेल, ढाबे आणि खानावळींचे व्यावसायिकही थेट कातकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

कातकरी समाजासाठी पारंपरिक आधार

कातकरी समाजासाठी खेकडे पकडणे हा केवळ हंगामी व्यवसाय नसून त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचा अविभाज्य भाग आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक कुटुंबांचा घरखर्च भागतो. शेतीची कामे सुरू होण्यापूर्वी तसेच मोकळ्या वेळेत संपूर्ण कुटुंब या कामात सहभागी होते. लहानपणापासूनच मुलांना खेकड्यांची बिळे ओळखणे, सुरक्षितपणे खेकडे पकडणे, त्यांची योग्य हाताळणी करणे आणि विक्रीसाठी तयार ठेवणे याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हे पारंपरिक कौशल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जतन झाले असून आजही अनेक कातकरी कुटुंबे ही परंपरा कायम राखत आहेत.

पारंपरिक समजुतींमुळे रस्सा लोकप्रिय

काळ्या खेकड्याच्या रस्स्याबाबत ग्रामीण भागात अनेक पारंपरिक समजुती प्रचलित आहेत. पावसाळ्यात हा रस्सा शरीराला ताकद देतो, सर्दी-खोकल्याच्या काळात आराम मिळण्यास मदत करतो आणि आजारातून लवकर सावरण्यास उपयोगी ठरतो, अशी धारणा आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होताच खेकड्याच्या रश्श्यासाठी विशेष मागणी वाढते. मात्र, या समजुतींना ठोस वैज्ञानिक पुष्टी उपलब्ध नाही. तरीही प्रथिनांचा चांगला स्रोत म्हणून देशी खेकड्याकडे पाहिले जाते आणि त्याच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे खवय्यांमध्ये त्याची लोकप्रियता कायम आहे.

पावसाळा सुरू झाला की आमच्या मित्रमंडळींची खेकडे खाण्याची ट्रिप ठरलेलीच असते. वाकड परिसरातून आम्ही मुद्दाम मावळ आणि मुळशी भागात जातो. तेथील कातकरी बांधवांकडून जिवंत काळे खेकडे खरेदी करून काही वेळा घरी आणतो, तर काही वेळा स्थानिक हॉटेलमध्येच रश्श्याचा आस्वाद घेतो. शहरात मिळणाऱ्या खेकड्यांपेक्षा मावळ-मुळशीतील देशी काळ्या खेकड्याची चव वेगळीच असते. आठवड्यात दोन वेळा तरी खेकडे खाण्यासाठी आम्ही आवर्जून या भागात जातो. आमच्या संपूर्ण ग्रुपसाठी हा आता पावसाळ्यातील एक ठरलेला कार्यक्रमच झाला आहे.
दिनेश वाजे, स्थानिक तरुण, वाकड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT