

वल्लभनगर: ऐन मतदानाच्या दिवशी मतदार यादीत नाव नसल्याचा धक्का बसू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक आता सतर्क झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला शहरात वेग आला असून, मतदार यादीत नाव कायम राहावे आणि माहिती अद्ययावत व्हावी, यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. कासारवाडी, वल्लभनगरसह शहरातील अनेक मतदान केंद्रांवर आणि शाळांमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्याभोवती नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाने ३० जूनपासून सुरू केलेली ही मोहीम आता ८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपली माहिती तपासून घेण्यासाठी आणि आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. अनेक मतदार थेट शाळांमध्ये जाऊन बीएलओंकडून इन्यूमरेशन फॉर्म भरून घेत आहेत. बीएलओ घरोघरी जाऊन फॉर्मचे वाटप आणि संकलन करत असले तरी नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे दिवसभर घराबाहेर असणारे तसेच बाहेरगावी गेलेले मतदार स्वतःहून बीएलओंच्या संपर्कात येत आहेत. परिणामी, अनेक केंद्रांवर आणि शाळांमध्ये बीएलोंभवती नागरिकांचा गराडा पडत आहे.
वेळेत काम करण्याचे प्रशासनापुढे आव्हान
शहरात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला वेग आला असला तरी फॉर्म वाटप, फॉर्म संकलन आणि ऑनलाइन डिजिटायझेशनचे ५० टक्क्यांहून अधिक काम अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनासमोर हे काम वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
८ ऑगस्टपर्यंत मोहिमेला मुदतवाढ
दरम्यान, एसआयआर मोहिमेसाठी ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने नागरिकांना मतदार यादीतील आपली माहिती तपासून घेण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रांसह इन्यूमरेशन फॉर्म भरून देण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या भागातील बीएलओशी संपर्क साधून मतदार यादीतील आपली माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे. मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शाळांमध्ये नागरिकांच्या रांगा
शहरातील अनेक शाळांमध्ये बीएलओ दिवसभर उपलब्ध असल्याने मतदार मोठ्या संख्येने तेथे भेट देत आहेत. या मोहिमेत प्रत्येक मतदाराच्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करून नवीन मतदारांची नोंदणी, नाव, पत्ता व जन्मतारखेतील दुरुस्ती, स्थलांतरित आणि मृत मतदारांची नावे वगळणे, तसेच फोटो व इतर तपशील अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. मतदानाच्या वेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक मतदाराच्या माहितीची अचूक नोंद करण्यावर भर दिला जात आहे.
पाऊस, पालखीमुळे काम रेंगाळले
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तात अनेक कर्मचारी व्यस्त असल्याने या मोहिमेचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र, आता राहिलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी घरभेटी, फॉर्म वाटप, संकलन आणि ऑनलाइन डिजिटायझेशनच्या कामाला पुन्हा गती देण्यात आली असून, प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.