पिंपरी : सिगारेटचे पैसे मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन जणांनी एका तरुणाला दांडक्याने मारहाण करून, त्याच्या चेहऱ्यावर सिमेंटचा ब्लॉक मारला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (दि. 24) दुपारी लांडेवाडी कमानीजवळ, भोसरी येथे घडली.
या प्रकरणी नागेश दत्ता अनसरवाडे (28, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल क्षीरसागर ऊर्फ संभ्या (32, रा. विठ्ठलनगर, लांडेवाडी, भोसरी), सचिन सहादु गाडेकर (38, रा. विठ्ठलनगर, लांडेवाडी, भोसरी), केतन सावंत ऊर्फ पिदया (32, रा. भोसरी) आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सचिन गाडेकर याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ आकाश अनसरवाडे हा त्याच्या टपरीवर बसलेला असताना आरोपी दोन मोटारसायकलवरून तिथे आले. त्यांनी सिगारेट घेऊन तिचे पैसे न देताच निघून जात असताना आकाशने त्यांना पैसे मागितले. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी त्याला, मी कोण आहे तुला माहिती आहे का, तुला आता सोडणार नाही, असे म्हणत त्याच्या तोंडावर दांडक्याने मारहाण केली. आरोपी केतन याने जमिनीवर पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून आकाशच्या चेहऱ्यावर फेकून मारला. आकाश खाली पडल्यानंतर इतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत आकाशच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या जबड्याच्या खालील डावी बाजू फ्रॅक्चर झाली आहे. तो सध्या बेशुद्ध अवस्थेत एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. भोसरी पोलिस तपास करत आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत देशी बनावटीचे पिस्टल, गावठी कट्टा आणि कोयता जप्त करण्यात आला आहे. या कारवाया दिघी, निगडी आणि रावेत येथे करण्यात आल्या.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत राकेश विजय सोळंकी (22, रा. तापकीर नगर, दिघी) याला अटक केली. त्याच्याकडून पाचशे रुपयांची पालघन आणि तीनशे रुपयांचा कोयता अशी शस्त्रे जप्त केली आहेत. पोलिस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी अदित्य शांताराम उगले (20, रा. कृष्णानगर, चिखली) याला ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथून अटक केली. त्याच्याकडून 49,500 रुपये किमतीचा देशी गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई लक्ष्मण कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे.
रावेत पोलिसांनी गौस अताऊला शेख (29, रा. देहूरोड) याला म्हस्केवस्ती, रावेत येथे अटक केली. आरोपीने विक्रीसाठी 54,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या बाळगले होते. पोलिस शिपाई आशिष बोटके यांनी फिर्याद दिली आहे. दापोडी पोलिसांनी ओम भरत चामे (19, रा. नखाते वस्ती, रहाटणी) याला कासारवाडी कचरा केंद्राजवळून अटक केली. त्याच्याकडून 52 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.