भोसरी : उड्डाणपुलाच्या खालून धावडेवस्तीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना उंचीचा अंदाज येत नसल्यामुळे कठडे तुटण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
भोसरी येथील अत्यंत वर्दळीचा राजमाता जिजाऊ उड्डाणपुलावरील सिमेंट काँक्रीटचे कठडे तुटलेल्या स्थितीत आहेत. उड्डाणपुलाखाली उंच व अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. उंच आणि अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना उड्डाणपुलाखालून वाहतूक करण्यासंदर्भात उपयोजना करण्याची मागणी केली जात आहे.
राजमाता जिजाऊ उड्डाण पूल हा भोसरी, पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसर आणि पुणे शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. दररोज अवजड ट्रक, कंटेनर आणि बसची वाहतूक या पुलावरून व पुलाखालून होत असते. परिसरातून उंच व अवजड वाहने जात असल्याने कठड्यांना धक्के बसत आहे. परिणामी काँक्रीटचे तुकडे सैल होऊन खाली पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या तुटलेल्या कठड्यांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक, वाहनचालक यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुलाखालून जाणाऱ्या उंच वाहनांना पुलाच्या ठरावीक अंतरावरून वळविण्यात येईल. जेणेकरून वाहने पुलाच्या कठडयांना किंवा पुलाला हानी पोहचणार नाही, यासाठी योग्य त्या उपाययोजना लवकर करण्यात येणार आहे.अमोल पाचंगे, कनिष्ठ अभियंता, महापालिका
दरवेळी काहीतरी अपघात झाल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडतात. पुलाखाली आणि उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती तसेच नियमित तपासणी संदर्भात उपाययोजना करणे गरजेचे आहे.नागरिक