वर्षा कांबळे
पिंपरी: कोट्यवधी रुपये खर्च करून 130 खाटांची क्षमता असलेले नवीन भोसरी रुग्णालय बांधण्यात आले आहे. मात्र, येथील अपुऱ्या जागेमुळे गैरसोयीत भर पडत आहे. या ठिकाणी भोसरी, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, धावडेवस्ती या ठिकाणचे नागरिक उपचारासाठी येतात. तसेच, या ठिकाणी एमआयडीसी असल्याने दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे रुग्णांचा ओघ दररोज असतो; परंतु अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा
येथे बाह्य व आंतररुग्ण विभाग आहेत. येथे जुन्या व नवीन केसपेपर काढण्यासाठी स्वतंत्र रांग दिसून येते. जन्म-मृत्यू नोंद, औषध वितरण, गरोदर माता तपासणी व लसीकरणासाठी स्वतंत्र कक्ष आणि हिरकणी कक्ष आहेत. तसेच, गरोदर माता व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र केसपेपर कक्ष आहे. इंजेक्शन रूम, महिला व पुरुष मेडिसीन विभाग, सोनोग्राफी, बालरोग, स्रीरोग, गरोदर माता अशा 13 प्रकारच्या ओपीडी रुग्णालयात आहेत.
ऑर्थोपेडिक, सर्जिकल वॉर्ड नाही
रुग्णालयात प्रसूतीगृहासाठी 70 बेड आहेत. 40 बेड मेडिसीनचे तर 10 बेड आयसीयू आहेत. तसेच, 5 बेड एनआयसीयू, 5 बेड इतर रुग्णांसाठी आहेत. रुग्णालयात सोनोग्राफी, एक्स रे, लसीकरण, कुटुंबकल्याण, रक्त तपासणी, शस्त्रक्रिया विभाग, दंतरोग विभाग आहेत. नर्सिंग स्टाफ, फिजिशियन, चेस्ट फिजिशियनदेखील आहेत. रुग्णालयात गायनिक सर्जन आहेत. फक्त सर्जिकल वॉर्ड आणि सर्जिकल आयसीयू नाही. तसेच, सर्जन नसल्याने इतर प्रकारच्या जनरल सर्जरी येथे केल्या जात नाहीत. त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तींवर उपचार करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. तसेच, रुग्णालयात ऑर्थोपेडिक विभागही नसल्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कॅन्टीनची सुविधा नाही
रुग्णालयात कॅन्टिनची सुविधा नसल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होते. कधी कधी रुग्णांना नाष्ठा केल्यानंतर काही टेस्ट करण्यास सांगितल्या जातात. अशावेळी कॅन्टिन नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. तसेच, ॲडमिट रुग्णांबरोबर असलेल्या व्यक्तीचीदेखील खाण्यापिण्याची आबाळ होते.
ओपीडीसाठी अपुरी जागा
रुग्णालयात ओपीडीसाठी जागा अपुरी आहे. त्यामुळे रुग्णालयात गर्दी झाल्यावर रूग्ण आणि नातेवाईकांना बसण्यास जागा मिळत नाही. अपुऱ्या जागेमुळे कर्मचारी, रूग्ण आणि नातेवाईकांची दमछाक होते. गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता
रुग्णालयात कायमस्वरूपी कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र, हे कंत्राटी कर्मचारी सारखे रुग्णालय बदलत असल्याने याठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवते. परिणामी कायमस्वरूपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण पडतो. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.