भोसरी: श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त भोसरी गावठाणातील बैलगाडा घाटात रंगलेल्या पारंपरिक शर्यतींनी यंदा अभूतपूर्व थरार अनुभवायला मिळाला. सकाळपासूनच बैलगाडा शौकिनांनी घाट परिसर गजबजून गेला होता. वेग, ताकद आणि अचूक समन्वय यांची अप्रतिम सांगड घालत स्पर्धकांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली.
भोसरी येथील बैलगाडा घाटाचे पूजन महापौर रवी लांडगे, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक ॲड. नितीन लांडगे, सागर गवळी, विराज लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा बैलगाडा मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भानुदास लांडगे यांच्यासह माजी नगरसेवक पंडित गवळी, विजय फुगे, भानुदास फुगे, शेखर लांडगे, किशोर गव्हाणे, बाजीराव लांडगे, किसन शिंदे, गुलाब लांडगे, ॲड. गणेश फुगे नामदेव लांडगे, संजय गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या शर्यतीत चऱ्होलीतील भाऊसाहेब गिलबले आणि गणेश सस्ते यांच्या बैलजोडीने 12.34 सेकंदात शर्यत पूर्ण करत “घाटाचा राजा” हा मान पटकावला. त्यांच्या या कामगिरीवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. फळी फोडीच्या थरारक फेरीत हिंदवी वडेवाले आणि समीर दाभाडे यांच्या जुगलबंदीतील बैलगाड्याने 12.57 सेकंदांची वेळ नोंदवत मान मिळविला. मात्र खरी रंगत अंतिम फेरीत पाहायला मिळाली. या फेरीत हिंदवी वडेवाले आणि समीर दाभाडे यांच्या बैलजोडीने अवघ्या 12.26 सेकंदात शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांकावर झेंडा रोवला.
स्पर्धेतील इतर निकालही चुरशीचे ठरले. गणेश यादव यांच्या बैलजोडीने 12.40 सेकंदात शर्यत पूर्ण करत द्वितीय क्रमांक पटकावला. तर गिलबले-सस्ते यांच्या जोडीने 12.41 सेकंदात तृतीय आणि प्रकाश कबाड्डी यांच्या बैलजोडीने 12.47 सेकंदात चौथा क्रमांक मिळवला.
सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या शर्यती सायंकाळी सात वाजेपर्यंत रंगल्या. दिवसभर घाटात जल्लोषाचे वातावरण होते. पारंपरिक बैलगाडा शर्यतींचा हा सोहळा म्हणजे ग््राामीण संस्कृतीचा जिवंत वारसा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अशोक लांडगे यांनी घड्याळ मास्तर, संदीप माने यांनी निशाण बहादूर काम पाहिले.