Bhaubeej Digital Payment Pudhari
पिंपरी चिंचवड

Bhaubeej Digital Payment: भाऊबीजेच्या ओवाळणीला डिजिटल टच! पाकिटातील पैशांची जागा आता यूपीआय पेमेंटने घेतली

गुगल पे, फोन पेवरून भावांकडून बहिणींना ओवाळणी; अंतर दूर असले तरी प्रेमाचा गोडवा कायम, डिजिटल व्यवहार करताना सावधगिरीचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

चिंचवड: भाऊबीज म्हटले की बहिणीने भावाला ओवाळणी करून औक्षण करणे आणि त्यानंतर भावाने बहिणीला प्रेमाने ओवाळणी देणे. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, बदलत्या काळानुसार या परंपरेतही आधुनिकतेची भर पडली आहे. पूर्वी ओवाळणीच्या ताटात पाकीट ठेवून दिले जाणारे पैसे आता मोबाईलच्या माध्यमातून पाठवले जात आहेत.

दिवाळी म्हटली की नवीन कपडे, फराळ, रोषणाई, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेची ओवाळणी डोळ्यांसमोर येते. पूर्वी सणासुदीला नातेवाईकांच्या हातात ठेवले जाणारी पैशाचे पाकीट, त्यातील नवीन नोटा आणि प्रेमाने दिलेले शुभेच्छांना विशेष महत्त्व होते. मात्र, बदलत्या काळानुसार या परंपरेला आता तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.

पेमेंट करताना काळजी घ्या

डिजिटल व्यवहार सोपे झाले असले तरी ऑनलाईन फसवणुकीचा धोका कायम आहे. पैसे मिळवण्यासाठी यूपीआयचा गोपनीय क्रमांक (पिन) टाकण्याची आवश्यकता नसते. अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करून पैसे स्वीकारण्याचा प्रयत्न करू नये. पैसे पाठवण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे नाव आणि रक्कम तपासावी. संशयास्पद दुवे, बनावट भेटकार्डे आणि आकर्षक सवलतीच्या नावाखाली येणाऱ्या संदेशापासून सावध राहावे.

यूपीआय, गुगल पे, फोन पे आणि इतर डिजिटल पेमेंट सुविधांमुळे भाऊबीजेच्या दिवशी पैशाची देवाण-घेवाण अधिक सोपी झाली आहे. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त दूर राहणारे भाऊ-बहीण प्रत्यक्ष भेटू शकत नसले तरी मोबाईलवरून पैसे पाठवून सणांचा आनंद द्विगुणीत करत आहेत. तंत्रज्ञानामुळे व्यवहार सोपे झाले असले तरी भाऊ- बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा मात्र कायम आहे. पाकिटातील ओवाळणीची जागा आता मोबाईल ने घेतली असली तरी सणामागील भावना आजही तितकीच जिवंत आहे.

पूर्वी भाऊबीजेसाठी आकर्षक पाकिटांना मोठी मागणी असायची आता अनेक जण मोबाईलवरूनच पैसे पाठवण्यास पसंती देत आहेत.
नितीन ब्राह्मणकर, दुकानदार.
भाऊ प्रत्यक्ष भेटून ओवाळणी देतो त्याचा आनंद वेगळाच असतो. मात्र, दूर असताना मोबाईलवरून पैसे पाठवले तरी त्यामागील प्रेम महत्त्वाचे आहे.
सविता झोडगे, गृहिणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT