Cyber Fraud Pudhari
पिंपरी चिंचवड

Alandi Cyber Fraud Case: सायबर फसवणुकीचा मोठा पर्दाफाश; आळंदी पोलिसांच्या जाळ्यात म्युल अकाउंट पुरवठादार

९ बँक खात्यांतून १.१५ कोटींचे संशयित व्यवहार; ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट व टास्क फ्रॉडमधून १५० कोटींच्या फसवणूक रॅकेटचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: देशभरातील नागरिकांना ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट आणि टास्क फ्रॉडच्या जाळ्यात ओढून तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतील 'म्युल अकाउंट' पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या नऊ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सायबर गुन्ह्यांशी संबंधित एक कोटी १५ लाख रुपयांचे संशयित व्यवहार आढळून आले आहेत.

सचिन संजय काळे (२५, रा. मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल असून, आरोपीला आळंदी पोलिसांच्या सायबर सेलने मोशी येथील गोडाऊन चौक परिसरातून ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉसमॉस बँकेच्या आळंदी शाखेतील एका बचत खात्याचा वापर ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांची छाननी करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीने स्वतःच्या नावावर तब्बल नऊ वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडल्याचे निष्पन्न झाले.

ही सर्व खाती आरोपीने सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात दिली होती. त्या खात्यांवर फसवणुकीची रक्कम जमा झाल्यानंतर ती एटीएम आणि धनादेशांच्या माध्यमातून काढून संबंधित टोळीपर्यंत पोहोचवली जात होती. या बदल्यात आरोपी मोठ्या प्रमाणात कमिशन स्वीकारत असल्याचे तपासात समोर आले आहे.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरील माहितीनुसार, या रॅकेटद्वारे देशभरातील ६५ नागरिकांची एकूण १५० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपीच्या खात्यांमध्येच एक कोटी १५ लाख रुपयांचे संशयित व्यवहार झाल्याची नोंद असून, या प्रकरणातील आर्थिक साखळीचा आणि इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर गुन्ह्यांच्या तपासात म्युल अकाउंट पुरवठादारांवर सुरू असलेल्या कारवाईला या प्रकरणामुळे मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

म्युल अकाउंट म्हणजे काय?

सायबर गुन्हेगार फसवणुकीची रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न घेता कमिशनचे आमिष दाखवून किंवा भूलथापा देऊन इतर व्यक्तींची बँक खाती वापरतात. अशा खात्यांचा वापर फसवणुकीतील पैसे जमा करणे, काढणे आणि पुढे हस्तांतरित करण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे गुन्हेगारी व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या खात्यांना 'म्युल अकाउंट' असे म्हटले जाते.

सायबर गुन्हेगार आर्थिक आमिष दाखवून नागरिकांची बँक खाती आणि सिमकार्ड भाड्याने किंवा वापरासाठी घेतात. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपले बँक खाते, एटीएम किंवा आर्थिक व्यवहारांसाठी प्रवेश देऊ नये. अनोळखी स्त्रोताकडून आलेली रक्कम काढून देणे हा गंभीर गुन्हा आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये.
मारुती जगताप, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-३, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT