

लोणावळा: शहरातील मावळा पुतळा चौक मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा अड्डा बनला आहे. या ठिकाणी तीनही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. पाच ते दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी नागरिकांना पाऊण ते एक तासाचा कालावधी लागत आहे.
या कोंडीवर नियंत्रण ठेवण्याचे कोणतेही धोरण पोलिस प्रशासन व नगर परिषदेने अंमलात आणलेले नाही. दिवसेंदिवस या ठिकाणी होत असलेली कोंडी हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरू लागली आहे. शाळेतील मुलांना घेण्यासाठी व त्यांना शाळेमध्ये सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांना व स्कूल व्हॅन चालकांना या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे.
रस्त्यावरच पार्किंग
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कोणतीही दीर्घकालीन उपाययोजना लोणावळा नगर परिषदेने व शहर पोलिसांनी तयार केलेली नाही. शहरातील अरुंद रस्ते, जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करण्याची अंगवळणी पडलेली सवय, आम्ही स्थानिक आहोत या आविर्भावात दुकानांसमोर वाहने उभी केली जात आहेत. याचेच अनुकरण आता शहरात येणारे पर्यटकदेखील करू लागले आहेत.
वाहतूक नियंत्रणासाठी बारा वाॅर्डन
लोणावळा नगर परिषदेने वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना मदतनीस म्हणून बारा वाॅर्डन दिले आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त वाॅर्डन हे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरच काम करण्यात समाधान मानत आहेत. मुख्य बाजारपेठेमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ना कोणी वाॅर्डन उपलब्ध असतात ना पोलिस कर्मचारी. शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी शहरातील वाहतुकीच्या समस्येला प्राधान्य क्रमाने सोडवणार असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र असे काही होताना दिसत नाही.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
नगर परिषदेमधील सत्ताधाऱ्यांना वाहतूक कोंडीचे सोयीर सुतकदेखील नाही. स्थानिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होवो अथवा न होवो आम्ही मात्र केवळ ठराव करण्यापुरतेच नगरसेवक आहोत, या व्यतिरिक्त आम्ही दुसरे काही करू शकत नाही, अशीच काहीशी परिस्थिती नगर परिषदेत पहायला मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते मात्र सोशल मीडियावर घसा कोरडा होईपर्यंत ओरडत आहेत. मात्र, त्यांचा आवाजदेखील प्रशासनापर्यंत पोहोचत नसल्याचे या निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून स्पष्टपणे जाणवत आहे.
व्यावसायिकांचे अतिक्रमण
लोणावळा शहरामध्ये वाहनांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या, रस्त्यावर झालेली अतिक्रमणे, हॉटेल व दुकान व्यावसायिकांचे रस्त्यावरच लावण्यात आलेले लोखंडी बोर्ड व जागा मिळेल त्या ठिकाणी होत असलेले रिक्षा व टुरिस्ट वाहनांचे स्टॅन्ड यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्किल बनले आहे. लोणावळा शहरामध्ये वाहने उभी करण्यासाठी कोठेही जागा उपलब्ध नाही. मात्र, आता रस्त्यावरून वाहने चालवणेदेखील डोकेदुखी ठरू लागले आहे. अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरासाठी नागरिकांना किमान पाऊण ते एक तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मागील महिनाभरापासून शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक नागरिक आपल्या चारचाकी वाहनांमधून बाजारात जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, वाहतूक कोंडीने अक्षरक्षा: त्यांचे कंबरडे मोडले आहे. आठवड्याचे सातही दिवस बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
वीकेंडला लागताहेत वाहनांच्या रांगा
शहरामध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक येत असतात. यामुळे शनिवार व रविवारी होणारी कोंडी ही सर्वश्रुत बनली आहे. मात्र, याव्यतिरिक्त सोमवार ते शुक्रवार या वीक डेच्या काळामध्ये होणारी कोंडी मात्र मनस्ताप देणारी ठरत आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वर्षाचे 365 दिवस वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते. आता शहरामध्ये व शहरातील अंतर्गत चौकांमध्येदेखील हीच परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. वाहनचालकांचा बेशिस्तपणा, पोलिसांचा वेळकाढूपणा व नगर परिषदेचे या सर्व गोष्टींकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष याचा त्रास हा शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.