

पिंपरी: केंद्र व राज्य शासनाने वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य केले आहे. सर्व वाहनधारकांना बसविण्यास गैरसुविधा होऊ नये, म्हणून शासनाकडून चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. तरीदेखील शहरात सुमारे दहा लाख वाहने विना एचएसआरपी रस्त्यावरून धावत आहेत.
त्यामुळे नंबरप्लेट न बदलणाऱ्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओने ) कारवाई सुरू केली आहे. परिवहन विभागाने राज्यातील एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बसवणे बंधनकारक केले आहे. तर, एक जानेवारी २०२५ पासून या नव्या नंबरप्लेट बसविण्याची सुविधा सुरू करण्यात आली.
वारंवार मुदतवाढ देऊनही एचएसआरपीला मिळणारा अल्प प्रतिसाद लक्षात घेता परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांचे हस्तांतरण, नोंदणी, प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना - हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे, आदी वाहनाविषयक सर्व कामकाज एचएसआरपी बसविल्याशिवाय १६ जून २०२५ पासून करण्यास मनाई केली होती. त्यानंतरही वाहनधारकांनी एचएसआरपी बसविण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये एकून २५ लाख वाहनांची नोंद आहे. यामध्ये १५ लाख ३९ हजार वाहने २०१९ पूर्वीची आहेत. यापैकी केवळ सात लाख वाहनधारकांची एचएसआरपीसीसाठी नोंद केली होती. यातील सुमारे पाच लाख ४७ हजार ३१४ वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यात आल्या आहेत, तर सुमारे दहा लाख वाहनांवर अद्याप एचएसआरपी बसवलेल्या नाहीत. एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास पहिल्यांदा एक हजार रुपये दंड. दुसऱ्यावेळी या नियमाचे उल्लंघन केल्यास पाच ते दहा हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागतो.
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी वारंवार मुदत वाढ देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. पहिल्यांदा १५ ऑगस्ट २०२५ , त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२५, तिसऱ्यांदा ३१ डिसेंबर २०२५ आणि ३० जून २०२६ पर्यंत अशी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही अनेक वाहनधारकांनी नवीन नंबरप्लेट बसविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
राहुल जाधव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड.