आकुर्डी: प्रभाग क्रमांक 16 मधील गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी, राऊतनगर, एस. बी. पाटील शाळा सीमा भिंतीलगतचा रस्ता, धर्मराज चौक, इस्कॉन मंदिर, शिंदेवस्ती, लक्ष्मीनगर, रावेत आणि विकासनगर परिसरातील रस्ते खड्डेमय झाले असून, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे या रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण करावे, अन्यथा प्रशासनाविरोधात उपोषण करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी दिला आहे.
या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारक व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या समस्यांचा पाढा नगर सदस्या या नात्याने प्रशासनासमोर अनेक वेळा मांडूनही या मागणीबाबत कोणतीही दखल अथवा ठोस कार्यवाही प्रशासनाकडून झाली नाही. समस्त नागरिक, वाहनचालक, प्रवासी यांच्या हिताचा विचार करून या रस्त्यांचे डांबरीकरण तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका तरस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रावेत, किवळे, शिंदेवस्ती, वाल्हेकरवाडी व इतर भागातील वाढत्या रहदारीमुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहने सावकाश चालवावी लागत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे स्थानिक वाहनचालक, प्रवासी यांचे हाल होत आहेत. नागरिकांच्या या मागणीचा तत्काळ पाठपुरावा करून कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
महापालिका परिसरातील विकसित प्रभाग म्हणून गुरुद्वारा, रावेत, किवळे, विकासनगरकडे बघितले जाते. परंतु प्रभाग क्रमांक 16 च्या एस. बी. पाटील विद्यालयाच्या सीमा भिंतीलगत अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून, या मध्यवर्ती भागात दाट लोकवस्ती असून सतत रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनचालक व पायी प्रवास करतानाही रस्त्याच्या दुतर्फा जाणे भाग पडते. यामुळे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करावे.
रावेत, किवळे, विकासनगर या भागांतील अंतर्गत रस्त्यांचे तत्काळ डांबरीकरण करून स्थानिक नागरिकांना होणारा मनस्ताप टाळावा व लवकरात लवकर रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी.अनंत चौधरी, नागरिक