Kute Memorial Hospital Pudhari
पिंपरी चिंचवड

Kute Memorial Hospital: आकुर्डीतील कुटे मेमोरियल रुग्णालयात सुविधांचा अभाव; रुग्ण त्रस्त

सोनोग्राफीसाठी दोन आठवड्यांची प्रतीक्षा, कॅन्टिन नाही, स्वच्छतागृहांची दुरवस्था; कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवरही नाराजी

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या आकुर्डी येथील कै. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल रुग्णालय उभारणीसाठी 39 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. 5 मजली हे रुग्णालय 100 बेडचे आहे. राज्यातील सर्वांधिक प्रसूती करणारे रुग्णालय म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे. रुग्णालयात दररोज 900 ते 1 हजार रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णांच्या तुलनेत याठिकाणी असणाऱ्या सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

2022 साली रुग्णालय सुरू करण्यात आले. रुग्णालयात 60 बेड महिलांसाठी, तर 40 पुरुषांसाठी आहेत. तसेच, 12 आयसीयू आणि 10 एनआयसीयू आहेत. शस्त्रक्रिया विभाग आणि 2 सोनोग्राफी मशीन आहेत. रुग्णालयात 300 कर्मचारी असून, 65 कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. रुग्णालयात मेडिसीन वॉर्ड, बालरोग विभाग, प्रयोगशाळा विभाग, अतिदक्षता विभाग, प्रसूती विभाग, नवजात अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग, त्वचारोग विभाग, मानसोपचार तज्ज्ञ विभाग, दंतशल्य विभाग, लॅब, एक्सरे विभाग, सोनोग्राफी विभाग, फिजिओथेरपी विभाग आदी विभाग आहेत. रुग्णालयात 900 ते 1000 रुग्ण दररोज उपचारासाठी येतात.

सोनोग्राफी करण्यासाठी वेटिंग

रुग्णालयात सोनोग्राफीसाठी दोन मशीन उपलब्ध आहेत. त्यातील एक मशीन बंद आहे. त्यामुळे दुसऱ्या मशीनवर सोनोग्राफीसाठी खूप गर्दी असते. त्यामुळे दोन आठवड्यांनी रुग्णांना नंबर दिला जातो. त्यासाठी लांबच्या लांब रांगा लागत असल्यामुळे गरोदर महिलांची गैरसोय होते. रुग्णालयात आणखी एक सोनोग्राफी मशीन देण्याची मागणी रुग्णांकडून केली जात आहे.

रुग्णालयात कॅन्टिनची सुविधा नाही

रुग्णालयात कॅन्टिनची सुविधा नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाइकांची गैरसोय होते. रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिला आणि दाखल केलेले इतर रुग्ण, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण असतात. त्यांच्यासोबत एखादी व्यक्ती व लहान मुलेदेखील आलेले असतात. जेवण किंवा नाष्टा करण्यासाठी त्यांना बाहेर जावे लागते. रुग्णालयाच्या आसपास हॉटेलदेखील नाहीत. त्यामुळे त्यांना जेवण, नाष्टा करण्यासाठी लांब जावे लागते.

महिला विभागातील स्वच्छतागृहाची दुरवस्था

महिला विभागातील काही स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत. तर, वापरात असलेल्या स्वच्छतागृहातील प्रेशर पाईप आणि नळ तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच, स्वच्छतागृहांच्या दरवाज्यांच्या कड्या तुटल्या आहेत. वॉश बेसिनचे नळदेखील बंद आहेत. याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कर्मचार्ऱ्यांकडून उद्धट वागणूक दिली जाते. रुग्णांना आरोग्य सेवा आणि इतर विभागांची माहिती नीट न देणे असे प्रकार येथील कर्मचाऱ्यांकडून सर्रास केले जातात. त्यामुळे रुग्णांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

रुग्णालयात इतर सुविधा चांगल्या आहेत; पण कर्मचारी रुग्ण आणि नातेवाईकांशी उद्धटपणे वागतात. सोनोग्राफीसाठी दोन आठवड्यांनी नंबर दिला जातो. तसेच, कॅन्टिन नसल्याने रुग्णांबरोबरच्या व्यक्तीची गैरसोय होते.
हरीश काळे, नागरिक, आकुर्डी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT