30 डिसेंबर 1987 दिवस..! पिंपरीतील रॉक्सी हॉटेलच्या चौकात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत नगरसेवक झालेले आझम पानसरे हे त्यांच्या मोरवाडी कट्ट्यावरील राजाराम कापसे, शरद गावडे, मारुती सोरटे, तुकाराम ढमाले या विशी पंचविशीतील पोरांबरोबर उभे होते. शरद पवारांचा पुतण्या असलेला अजित पवार नावाचा एक तरुण पोरगा आज सर्वांना भेटायला येणार म्हणून ही सगळी गँग उभी होती. सहाच्या सुमारास महिंद्रा जीपमधून बॅगी पँट व इन न केलेला ढगळम शर्ट घातलेला हडकुळ्या शरीरयष्टीचा सहा फूट उंचीचा पोरगा जीपमधून खाली उतरला. या सर्वांनी मग इराणी हॉटेल म्हणून फेमस असलेल्या रॉक्सीमध्ये त्यांना नेलं. बुके द्यायचा असतो, फोटोग्राफर आणायचा असतो, अशी काहीच औपचारिकता न करता जवळपास येथे जमलेल्या 12 जणांनी मिळून सहा कप चहा सांगितला. व अर्धा अर्धा वाटत एकमेकांच्या अजित पवारांबरोबर ओळखी करून घेतल्या.
साहेबांचा पुतण्या आलाय म्हणून सर्वांना भारी अप्रूप वाटत होतं. तेव्हा व्हाया कासारवाडीवरून बुलेटवर मागे बसून थेट शेतातून पायजमा शर्टवर आलेल्या लक्ष्मण जगताप या नगरसेवकाचे उशिरा आगमन झाले. सर्वांनी मिळून मग हॉटेलचे बिल भरायला लक्ष्मण जगताप यांना लावलं. अजित दादांचं शहरातील हे पहिले पाऊल व पहिली भेट म्हणता येईल. माजी महापौर आझमभाई पानसरे यांना आज ही आठवण सांगताना गहिवरून आलं होतं. पुढे अजित दादा राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठे झाले असले तरी “अरे अजित” म्हणणारी जी काही मोजकी मंडळी आज शहरात आहेत, त्यामध्ये आझम पानसरे, मारुती सोरटे ही नावे प्रामुख्याने घेता येईल. जगदीश शेट्टी, योगेश बहल, संजोग वाघेरे, विलास लांडे ही तेव्हाची अजित दादांची समवयस्क तरुण मित्रमंडळी..! दादा उद्याचा खूप मोठा नेता असणार आहे, याची तिळमात्र जाणीव व शंका नसताना केवळ साहेबांचा पुतण्या म्हणून पिंपरी-चिंचवडकर जनतेने त्यांना दिलेली साथ पुढे या शहराच्या विकासाचे शिल्पकार अजित दादांना करून गेली.
2004 मध्ये अप्पूघरच्या समोरील वॉटर पार्कचे नवीन वेव्ह पूल, क्रेझी रिव्हर, रेन डान्स इत्यादी गोष्टी आणून नूतनीकरण केले गेले व उद्घाटन दादांच्या हस्ते करायचे ठरले. सकाळी दादांच्या बंगल्यावर पिंपरी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ तिथे गेलं. प्रचंड गर्दी होती त्याच दिवशी नेमके सुनील तटकरे यांचे मंत्रीपद गेले असल्याने दादा थोडेसे अपसेट होते ते बाहेर आले आणि लोकांना सांगितले की, “आज मला वेळ नाहीये मी मंत्रालयात जाणार आहे.” आणि गर्दीला उद्देशून सांगितले की, “आज कोणत्याही बदल्या व उद्घाटनासंदर्भात आलेल्या लोकांना आज मला वेळ देता येणार नाही. मात्र पिंपरी-चिंचवडमधील शिष्ट मंडळाला त्यांनी त्यांच्या पीएला बोलावून तारीख दिली आणि त्याचबरोबर सांगितले की, “मी चार तास वॉटर पार्क मध्ये थांबणार आहे.“ दादा उद्घाटनाच्या दिवशी आले बरोबर पिंपरी चिंचवडची सर्व मातब्बर नेते मंडळी उद्घाटनाला आलेली होती. विलास लांडे, लक्ष्मण जगताप, आझमभाई पानसरे, संजोग वाघिरे, मंगलाताई कदम, आर एस कुमार, प्रकाश म्हस्के आदी उपस्थित होते. दादांनी उद्घाटन करण्याआधी पूर्ण वॉटर पार्कचे निरीक्षण केले. बऱ्याच सूचना केल्या, पाहणी करता करता दादा वेव्ह पूल बघायला गेले, अप्पू घरच्या संचालनाची जबाबदारी असलेले डॉ. राजेश मेहता यांनी, वेव्ह पूल बनवताना वीज वाचवण्यासाठी काही बदल केले होते. त्यामुळे 120 याऐवजी आता फक्त 20 विजेचा वापर होणार होता व तशी 100 युनिट वीज वाचणार होती. पण लाटा निर्माण होताना आवाज थोडा जास्त येत होता, आता दादांनी नेमके त्याच्यावर बोट ठेवले आणि सांगितले की, “आवाज का येतोय.. इतर वेव्ह पूल मध्ये कधीच एवढा आवाज मी ऐकला नाही, मी आफ्रिकेमध्ये सन सिटीमध्ये बघितला होता तिथे पण एवढा आवाज येत नव्हता,“मग, दादांना सांगण्यात आले की, “दादा ही पूर्ण भारतीय बनावटीची यंत्रणा आहे आणि याच्यात वीज वाचवण्यासाठी 120 युनिट ऐवजी फक्त वीस युनिट वीज लागणार आहे त्यामुळे वेगळ्या यंत्रणेमुळे आवाज येतोय बाकी सिस्टीम व्यवस्थित आहे.
त्यानंतर क्रेझी रिवर ही राइट बघायला दादा गेले, ही राईड एक साधारण 30-35 फूट उंचीचा डोंगर उभा केला होता व त्यावरून राफ्टमध्ये बसून एक किंवा दोन जण तीस फुटांवरून स्लाईडने खाली तो राफ्ट वेगाने येत असे आणि येताना दोन्ही बाजूच्या भिंतीवर वर खाली करत खाली येऊन एका पाण्याच्या डबक्यामध्ये पडत असे, इथेही दादांचं निरीक्षण अतिशय काटेकोरपणे चालू होतं. दादा म्हणाले की, हा राफ्ट पलटी व्हायची खूप शक्यता आहे त्यामुळे अपघात घडू शकेल, तुम्ही नीट तांत्रिक बाजू तपासून हे केलं आहे ना? दादा आम्ही स्वतः त्याच्यामध्ये बसून दहा वेळा आलेलो आहे आणि तांत्रिक बाजू पूर्ण तपासलेली आहे. तरी देखील दादा म्हणाले, ‘मला असं वाटत नाही तो राफ्ट उलटा व्हायची शक्यता वाटते’ असं म्हणत दादा 40 मिनिटे थांबले आणि कमीत कमी 100 वेळा लोकांना बसवून तो राफ्ट वरून सोडला आणि खाली तो येईपर्यंत दादांनी पूर्ण निरीक्षण केले. आणि एकदाही राफ्ट उलटा झाला नाही हे पाहून मग दादा खुश झाले. तिथून दादा रेन डान्स बघायला आले. त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या व पिंपरी-चिंचवड मधील उद्घाटनाला आलेले सर्व नेते त्यावेळेच्या हवेली मतदारसंघासाठी इच्छुक होते. मग, दादा सर्व नेत्यांना म्हणाले की, “तुम्ही आता डान्स करा आणि मी बघतो, जो सगळ्यात चांगला डान्स करेल त्याला मी इथेच विधानसभेचे आमदारकीचे तिकीट जाहीर करतो, खूपच मोठा हशा पिकला. दादांच्या मिश्किल स्वभावाची येथे सर्वांनाच प्रचिती आली.”
दादांचा स्वभावातील अजून एक पैलू म्हणजे ते परखडपणे बोलतात स्पष्ट बोलतात,एकदा दादांना भेटायला पिंपरीत प्रचंड गर्दी होती.त्या वेळेला दादांना एक वयस्कर माणूस भेटायला आला, दादांनी विचारले, “काय हो काय काम काढलं ?तर ती व्यक्ती दादांना म्हणाली, दादा बघा ना माझ्या जावयाची कोकणामध्ये बदली झाली असून ती रद्द करण्यात यावी असे म्हटले.दादा पटकन तोंडावर बोलले की, “कोकणामध्ये काही माणसं राहत नाहीत का? तो पण आपल्या महाराष्ट्राचाच भाग आहे ना? तुम्ही मागच्या वेळी मला जावयाला नोकरी लावा म्हणून आला होता आणि मी त्यांना नोकरीला लावलं ना? मग आता कोकणात बदली झाली किंवा महाराष्ट्रात कुठेही झाली बदली तरी त्यांना काम करायलाच पाहिजे .माझ्याकडे आता बदलीसाठी म्हणून लगेच तगादा लावू नका. वर्ष दोन वर्ष त्यांना काम करू द्या त्याच्या आत माझ्याकडे बदलीसाठी येऊ नका..“ इतके स्पष्ट बोलण्याची ताकद त्या काळातल्या कोणत्याही पुढाऱ्यांमध्ये होती.
चिंचवडमधील प्रसिद्ध डॉक्टर सुभाष मेहता यांनी 1971 मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पहिले हॉस्पिटल चिंचवडला काळभोरनगर येथे मुंबई-पुणे रस्त्यावर बांधले होते. त्यांचे चिरंजीव डॉ. राजेश मेहता हे 1988 साली मिरज मेडिकल कॉलेज येथून पास झाल्यानंतर मेहता हॉस्पिटलमध्ये वडिलांबरोबर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. अखेर उद्घाटनासाठी अजित दादा यांना बोलवायचे ठरवले, त्याप्रमाणे आझम भाईबरोबर बोलणे केले व अजित दादांना भेटायला दापोडी येथील माननीय आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या घरी गेलो. दादा तिथे येणार होते. दादा आल्यानंतर त्यांच्याशी बोलणे केले, आणि दादांनी एका मिनिटात उद्घाटनासाठी येण्याची विनंती मान्य केली. दादांबरोबरच आझमभाई पानसरे, महापौर विलास लांडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजाभाऊ कापसे आणि शरद गावडे तसेच डीसीपी धोटेसाहेब इत्यादी माननीय उद्घाटनाला आले. उद्घाटन झाल्यानंतर दादांनी हॉस्पिटलची पाहणी केली हे सगळं झाल्यानंतर दादांनी सूचना केली की, हे हॉस्पिटल सर्व गोरगरिबांना परवडणारे असावे व चांगलीच सेवा देणारे असावे आणि आपण हे तसेच चालवावे. -विजय जगताप (ज्येष्ठ पत्रकार)
शहराची लोकसंख्या लाखांच्या घरात होती; मात्र तरीदेखील शहराला बस डेपो नव्हता. या मागणीसाठी आम्ही अजित पवारांकडे निवेदन दिले. त्यांनी तत्काळ त्या वेळच्या एस.टी. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि पिंपरी-चिंचवड शहरात आठ दिवसांत बसडेपो उभारण्याचे आदेश दिले. त्या वेळी अधिकाऱ्याने आठ दिवसांत डेपो उभारणे शक्य नसल्याचे सांगितले असताना दादांनी नेहमीच्या शैलीत सुनावले की, पत्रे लावून शेड उभारा; परंतु आठ दिवसांत डेपो उभारला गेलाच पाहिजे. त्या आदेशाचे पालन होऊन पिंपरी-चिंचवड शहरात वल्लभनगर येथे एस.टी. डेपो उभारण्यात आला. त्यांची प्रशासनावर असलेली पकड अशा अनेक कामाच्या प्रसंगातून दिसून येते. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागणीकडे ते गांभीर्याने पाहत होते.आर. एस. कुमार, माजी महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका
शहरातील एका सभेत मी त्यांना मागे उभा असलेला दिसलो. त्या वेळी विधानसभा निवडणुकीचे वातावरण होते. माझी त्यादरम्यान झालेली नाराजी त्यांनी ओळखून मला स्टेजवर बोलावून घेतले. स्वतःची खुर्ची सोडून म्हणाले की, ये बाबा, माझ्या खुर्चीवर बस, अशी आपुलकी, अशी सर्वसामान्यांना न्याय देण्याची वृत्ती असणारा नेता आज आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. अत्यंत दुःखद आणि हृदयविदारक घटना घडली आहे. अजितदादा हे फक्त राजकीय नेते नव्हते; ते आमच्या गोरगरिबांच्या, रस्त्यावर राबणाऱ्या ऑटो-टॅक्सीचालकांच्या, कामगारांच्या, वाहतूकदारांच्या खऱ्या साथीदार होते. त्यांची प्रशासनातील जरब, विकासकामांचा वेग, राज्याच्या प्रगतीचा स्पष्ट नकाशा त्यांच्या नजरेसमोर नेहमीच होता. दादांनी आमच्या संघटनेला, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी सन्मानाची वागणूक दिली.डॉ. बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, कष्टकरी जनता आघाडी
मी ग्रामपंचायत सदस्य असल्यापासून अजित पवार यांच्याबरोबर ओळख झाली. अजित पवार हे 1992 साली खासदारकीसाठी उभे असताना त्यांचा प्रचार पिंपरी-चिंचवड शहरात करणारा मी होतो. त्याकाळी प्रचार करताना हातात पेंटचा डब्बा घेऊन भिंती रंगवल्या आहेत. या कामाची दखल दादांनीही घेतली होती. आमची पक्षनिष्ठा बघून भरसभेत दादा म्हणाले होते की, माझा मोरेश्वर माझाच राहील आणि मी त्याला जरूर न्याय देईन, त्याला आमदार करेन. दादा पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आपुलकीने विचारपूस करीत असत.मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक
1992 पासून दादांच्या सानिध्यात आहे. आम्ही प्रश्न मांडायचे आणि त्यांनी सोडवायचे हे गणित ठरलेले होते. थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका लावून जागेवर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असायचे. उद्योगधंद्यांना बळकटी देण्याचे काम दादांनी केले आहे. दादांच्या जाण्याने घरचा माणूस गेला असून उद्योजक पोरके झाले आहेत. उद्योजकांसाठी झटणारा आधारवड हरपला आहे. कुदळवाडी प्रश्नावर त्यांची नुकतीच भेट घेतली होती. त्या वेळी समित्यांची निवडणूक संपली की, यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले होते. मात्र ती भेट शेवटची ठरलीसंदीप बेलसरे अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटना.
महाराष्ट्राच्या प्रागतिक वाटचालीत ठाम निर्णय घेणारा, संकटातही न डगमगणारा, दुर्लक्षित- कष्टकरी समाजाला तसेच उद्योगविश्वाला बळ देणारा नेता समाजासाठी केवळ राजकीय व्यक्ती नसतो, तो दिशादर्शक असतो. अशा नेतृत्वाची उणीव महाराष्ट्राला आज अधिक तीव्रतेने जाणवेल. विकास, धाडस आणि निर्णयक्षमता असलेला असामान्य लोकनेता पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली.हणमंतराव गायकवाड अध्यक्ष, बीव्हीजी इंडिया लि.