

संतोष शिंदे
पिंपरी: उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाने राज्यासह पिंपरी-चिंचवड पोलिस दलातही हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनावर पकड, थेटपणा आणि निर्णयक्षमता यासाठी ओळखले जाणारे अजित पवार हे पोलिसांसाठी नेहमीच कामाचा माणूस ठरले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाशी त्यांचे असलेले अनोखे नाते आणि त्यांनी केलेली ठोस कामे आज आठवणींच्या रूपाने अधोरेखित होत आहेत. पोलिस दलाला सक्षम करण्यासाठी अजित पवार यांनी केवळ सूचना दिल्या नाहीत, तर निधी, साधने आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. त्यांच्या पुढाकाराने एका झटक्यात जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला तब्बल 57 चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली. ऑक्टोबर 2024 मध्ये या वाहनांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. त्यामुळे गस्त, तातडीची मदत आणि गुन्हे नियंत्रणात मोठी मदत झाली.
महिला सुरक्षिततेस प्राधान्य
पुण्यातील बोपदेव घाटातील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील महिला सुरक्षिततेबाबत थेट पोलिसांकडून माहिती घेतली. केवळ आढावा न घेता, “महिलांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष द्या,” अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली. त्यांच्या या भूमिकेमुळे पोलिस यंत्रणा अधिक सजग झाल्याचे दिसून आले. एकूणच अजित पवार हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर पोलिस यंत्रणेला सक्षम, सज्ज आणि परिणामकारक बनवणारे पाठबळ होते. त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे आणि निर्णयक्षमतेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलाला नवी दिशा मिळाली. आज दादांच्या जाण्याने पोलिस दलातून एका खंबीर आधारस्तंभाला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.
दादांचा धसका आणि ठोस कारवाई
अजित पवार कोणत्याही वेळी स्पष्ट शब्दांत जाब विचारतील, याची जाणीव वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कायम होती. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय इमारतीच्या भूमिपूजना वेळी कौतुकाऐवजी त्यांनी थेट “कोयता गँगला चाप लावा, त्यांची धिंड काढा,” असे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक कारवाई करत 772 कोयते जप्त केले. तसेच पिस्तूल, तलवार, पालघन, सत्तूर, सुरा अशी एकूण 1,145 घातक शस्त्रे जप्त करून गुन्हेगारी टोळ्यांना धक्का दिला.
पायाभूत सुविधांसाठी भक्कम पाठबळ
वाकड येथील पेठ क्रमांक 39 मधील 15 एकर जागा पीएमआरडीएमार्फत पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. या जागेसाठी आवश्यक असलेला 249.12 कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारानेच मंजूर झाला. पोलिस आयुक्त चौबे यांनी केलेल्या पाठपुराव्याला दादांनी आर्थिक बळ दिले.
दादांना गुन्हेगारांची चीड
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्याला हादरवून टाकले असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाकड येथे कस्पटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी अत्यंत प्रखर आणि आक्रमक शब्दांत भूमिका मांडत, “या प्रकरणात कोणाचीही माफी नाही. गुन्हेगार कितीही मोठा, ताकदवान किंवा जवळचा असला तरी त्याला सोडले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला. “गुन्हेगारांची पाठराखण सरकार करणार नाही. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल,” असे ठणकावून सांगत त्यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तातडीने शिक्षा व्हावी, यासाठी सरकार सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, हा संदेश देत अजित पवार यांनी संवेदनशील प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाला पूर्णविराम दिला होता.