

पिंपरी: सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत आपल्या ताब्यातून निसटलेली पिंपरी-चिंचवड महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी यंदाच्या निवडणुकीत कंबर कसली होती. भाजपाला टक्कर देण्यासाठी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र आणले. अजित पवार यांनी शहरात तब्बल 15 जाहीर सभा घेतल्या. तसेच, अनेक मेळावे, बैठका व पत्रकार परिषद, रोड शोचा सपाटा लावला. राष्ट्रवादीच्या विजयासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अटोकाट प्रयत्न केले. शहर अक्षरश: पिंजून काढले; मात्र त्यांचे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले.
फेब्रुवारी 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नगरसेवक फोडत भाजपाने राष्ट्रवादीला अक्षरश: खिंडार पाडले होते. त्या बळावर आणि मोदी लाटेत फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भाजपाने उलथवून लावली. महापालिका हातातून निसटल्याची सल अजित पवार यांच्या मनात होती; मात्र, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांचे लक्ष पिंपरी-चिंचवड महापालिकेवर कायम होते. महापालिका पुन्हा काबीज करण्याचा चंग बांधला होता. त्यासाठी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात जनसंवाद सभाही घेतल्या. त्याला शहरवासीयांनी तुफान प्रतिसाद दिला. नऊ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांना व माजी नगरसेवकांना नवसंजीवनी देत आक्रमक भूमिका घेण्याचा सल्ला दिला होता.
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना फोडत भाजपाने आपल्या पक्षात घाऊक प्रवेश दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवारांनी भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत त्यांच्या हाती घड्याळ बांधले. भाजपाला टक्कर देण्यासाठी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणल्या. प्रचारात त्यांनी आवर्जून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार तसेच, खासदार अमोल कोल्हे, स्थानिक नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे यांनाही सोबत घेतले.
युतीतील भाजपावर तोफ डागत त्यांनी प्रचाराचा प्रारंभ तळवडे व चिखली येथील जाहीर सभेतून केला. त्या दिवसापासून त्यांनी महापालिकेतील भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा गैरकारभार, भ्रष्टाचार, निविदेतील रिंग, अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी, दादागिरी, गुंडगिरी, दहशत आदी मुद्दे बाहेर काढत भाजपावर सणसणीत आरोप केले. बेस्ट पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट करण्यासाठी राष्ट्रवादीला साथ देण्याचे आवाहन त्यांनी शहरवासीयांना वारंवार केले. शहरात त्यांनी तब्बल 15 जाहीर सभा घेतला. तसेच, रोड शो केले. त्यातून त्यांनी मतदारांशी संवाद साधत, शहर अक्षरश: पिंजून काढले. पण दादांचे स्वप्न अधुरेच राहिले.
दादांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपा बॅकफूटवर
प्रचाराचा धुरळा उडवत अजित पवार यांनी प्रतिस्पर्धी भाजपला हैराण करून सोडले होते. अजितदादांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपा काहीसा बॅकफूटवर गेला होता. विजयाच्या प्रचंड आत्मविश्वासाच्या तोऱ्यात असलेल्या भाजपाचे पदाधिकारी व उमेदवार काहीसे नरमले होते. तब्बल 125 नगरसेवकांचा दावा करणारे पदाधिकारीही अजितदादांचा रौद्र अवतार पाहून काहीसे थंड झाले होते. अजित पवारांच्या रोखठोक भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार व समर्थकांना मोठी एनर्जी मिळाली होती. त्यांनी प्रचारात आघाडी घेत प्रत्येक प्रभाग पिंजून काढला. मात्र, राष्ट्रवादीला अपेक्षित यश न मिळाल्याने अजितदादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.