पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मेट्रो व पीएमपीएल बसचा प्रवास मोफत केला जाणार आहे. तब्बल 9 हजार 600 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेकडून पीएमपीएमएल आणि मेट्रोला दरवर्षी 215 कोटी रुपयांची संचलन तूट देणे अवघड नाही. महापालिका स्वायत्त असल्याने त्यासाठी शासनाच्या मंजुरीची गरज नाही. आमचा पारदर्शक कारभार असल्याने विकासकामातील टक्केवारी बंद होऊन, बचत होईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरवासीयांना दिले.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आघाडीचा पिंपरी-चिंचवडसाठी हमीपत्र रविवार (दि. 11) कासारवाडी येथे जाहीर केले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे, शहराध्यक्ष तुषार कामठे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल आदी उपस्थित होते. अजित पवार यांनी सात संकल्प शहरासाठी सादर केली आहेत. शहराच्या मूलभूत प्रश्नांवर रोडमॅप मांडण्यात आला आहे. रोजच्या पाणीपुरवठ्यापासून ते रस्ते, आरोग्य, शिक्षण व पारदर्शक विकास आराखड्यापर्यंत, नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारे आश्वासन देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शहराला दररोज पाणीपुरवठा केला जाईल. टॅकर माफियांचे उच्चाटन केले जाईल. पाणी गळती 100 टक्के थांबली जाईल. ठप्प असलेला पवना बंद जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावण्यात येईल. पवना, इंद्रायणी व मुळा नदीचे प्रदूषण रोखण्याठी त्या नद्या स्वच्छ करण्यात येतील. पूराचा लोकवस्तीला शिरू नये म्हणून उपाययोजना केल्या जातील. प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांनी 30 कोटींचा खर्च कोठे केला, मात्र शहरातील प्रदूषण काही कमी झालेले नाही. पवार म्हणाले की, वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका करणार. रस्ते खड्डेमुक्त करणार. ठराविक मुदतीत रस्त्यांची दुरुस्ती करणार. तसेच मेट्रो मार्ग व उड्डाणपूल कामे निर्धारित वेळेत पूर्ण केली जातातील. इंदूर शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ केले जाईल. परवडणारे, हायटेक आरोग्यसेवा केंद्रांची निर्मिती करण्यात येईल. विस्तारित रुग्णालये, नवीन वैद्यकीय संस्था, 100 उपनगर क्लिनिक्स उभारून कमी दरातील तपासण्या केल्या जातील.
शहरात 100 पीसीएमसी मॉडेल शाळा सुरू करण्यात येतील. तेथे सीबीएससी व मराठी माध्यमासह राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, आधुनिक साधनसामग्री, प्रशिक्षित शिक्षक व विनामूल्य सुविधा असतील. पाचशे स्क्रेअर फूट घरांना मालमत्ताकर कर माफ करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना स्वयंरोजगारसााठी 5 लाखांचे व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
महापालिका डीपी आराखडा रद्द करणार
महापालिकेने तयार केलेला डीपी आराखडा रद्द करून नागरिकांच्या सहभागातून नवा आराखडा तयार करण्यात येईल. त्यावर तब्बल 50 हजार हरकती प्राप्त झाल्या आहेत. नवनिर्वाचित नगरसेवक व तज्ज्ञांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारी प्रकिया अतीसुलभ व सुटसुटीत करणार. सर्व जातीधर्माचे प्रार्थनास्थळांचे जतन व संगोपन करणार आहोत. जातीजाती तेढ निर्माण न करता, सर्व धर्मीयांना एकोप्याने राहण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
...रेड झोन प्रश्नी लक्ष घालू
रेड झोनचा प्रश्न हा संरक्षण विभागाशी संबंधित प्रश्न आहे. संरक्षण विभागाचा मुद्दा देशासाठी प्रथम स्थानी आहे. ॲम्युनिशन डेपोतील स्फोटक असल्याने रेड झोन तयार केला आहे. त्या भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहे. लोक राहत आहेत. रेड झोनबाबत संरक्षण विभागाशी चर्चा केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.