Ahilyadevi Holkar Jayanti Pudhari
पिंपरी चिंचवड

Ahilyadevi Holkar Jayanti: पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात; ‘पुण्यश्लोक’ महानाट्याला प्रचंड प्रतिसाद

नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात ऐतिहासिक जीवनप्रवासाचे प्रभावी सादरीकरण; लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नवी सांगवी येथील नटसमाट निळू फुले रंगमंदिरात रविवारी (दि. 31) ‌‘पुण्यश्लोक‌’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

महानाट्याची सुरुवात आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. या वेळी नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, कार्यकारी अभियंता विजय भोजने, माजी नगरसेवक राजू दुर्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पुण्यश्लोक फाउंडेशनचे धनंजय तानले, सामाजिक कार्यकर्ते अशोक खरात, सूर्यकांत गोफणे, नवनाथ बिडे, अभिमन्यू गाडेकर, विना सोनवलकर, अजय दुधभाते, बिरू व्हनमाने, सचिन सरक, दीपक भोजने, भरत महानवर आदी उपस्थित होते.

महानाट्याच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे व त्यांच्या कर्तृत्वाच्या सुवर्णपानांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. सुमारे 75 कलाकारांच्या सहभागातून साकारलेल्या या महानाट्याने उपस्थित प्रेक्षकांना इतिहासाच्या वैभवशाली दालनात घेऊन जाण्याचा अविस्मरणीय अनुभव दिला. अहिल्यादेवी होळकर यांचे दूरदर्शी नेतृत्व, प्रजेप्रती असलेली अपार बांधिलकी, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन व समाजहितासाठी केलेले कार्य यांचे प्रभावी चित्रण रंगमंचावर उभे राहिले.

लोककला, शाहिरी, ढोलवादन

महापालिकेच्या विचार प्रबोधन पर्वात मोरवाडी चौक, पिंपरी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. अंबादास पडळकर व त्यांच्या 30 सहकाऱ्यांनी आकर्षक गजनृत्य सादर केले. त्यानंतर ढोलवादन झाले.

सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव या विशेष कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविण्यात आले. भूपाळी, वासुदेव, पिंगळा, वाघ्या-मुरळी, धनगरी नृत्य, शाहिरी पोवाडे, आदिवासी आणि डोंबारी अशा विविध लोककला व व्यक्तीछटांच्या सादरीकरण करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT