दररोजच्या वाढत्या इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेच्या रेट्यामुळे केंद्र सरकारने अखेर इंधनाच्या उत्पादन शुल्कात कपात केली आहे. पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 5, तर डिझेलच्या उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात करण्यात आल्याने पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी (petrol and diesel prices) स्वस्त होणार आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारांनीही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) कमी केला, तर पेट्रोल व डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
कोरोना संक्रमणानंतर पहिले लॉकडाऊन संपल्यानंतर पेट्रोल, डिझेलचे दर दररोज वाढतच होते. पेट्रोलने दराची शंभरी गाठल्यानंतर वाहनधारकांच्या पोटात गोळा उठला. त्यानंतरही पेट्रोलने 116 रुपये, तर डिझेलने 105 रुपये मजल मारली. यानंतर जनतेतून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारांनी ग्राहकांना दिलासा देणारा कोणताही निर्णय घेतला नाही. तथापि, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करीत वाहनधारकांना काहीसा दिलासा दिला आहे.
विशेष म्हणजे, (petrol and diesel prices) गेले 6 दिवस पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी 35 पैसे दिवसागणीक वाढ होत होती, तर सातव्या दिवशी फक्त पेट्रोलमध्ये 35 पैशांची वाढ झाली होती; मात्र बुधवारी दोन्ही दर स्थिर राहिले. केंद्र सरकारने पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 5, तर डिझेलच्या उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केल्याने पेट्रोल, डिझेल दरातही कपात झाली आहे. नवीन दराची अंमलबजावणी रात्री 12 नंतर सुरू होणार आहे.
पेट्रोल 115.60 110.60
डिझेल 104.80 94.80
राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करावा, असे आवाहन केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही दर कमी होण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.