पित्ताशयाच्या समस्या : या आहाराचे सेवन करत असाल तर सावधान | पुढारी

पित्ताशयाच्या समस्या : या आहाराचे सेवन करत असाल तर सावधान

डॉ. योगेश चौधरी

गॉल ब्लाडर किंवा पित्ताशय शरीरात नेमके काय काम करते याविषयी लोकांना फारशी माहिती नाही; पण पित्ताशयामध्ये खडे होतात हे मात्र बहुतेकांना माहिती आहे. पित्ताशयात खडे होण्याच्या त्रासामध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्याचे कारण म्हणजे लोकांची बदललेली आहारशैली. काही आहार असे आहेत की, पित्ताशयाच्या समस्या वाढतात. त्यामुळे खालील आहाराचे सेवन करत असाल तर सावध व्हा.

ब्रेड आणि इतर बेकरी पदार्थ : बेकरी उत्पादने जसे ब्रेड, मफिन्स, कुकीज, कप केक इत्यादींचे सातत्याने केले जाणारे सेवन हे पित्ताशयाच्या आरोग्यावर प्रभाव पाडणारे ठरते. या सर्वच पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. यापैकी बहुतेक पदार्थ मैद्यापासून तयार होतात. पित्ताशयाशी निगडित त्रास असेल तर या उत्पादनांचे सेवन बिलकुल करू नये. त्याऐवजी आख्ख्या धान्यापासून तयार होणार्‍या पदार्थांचे सेवन करावे.

जास्त प्रथिनांचे सेवन धोकादायक : पित्ताशयाचे आरोग्य राखण्यासाठी मांसाहाराचे सेवन नियंत्रित केले पाहिजे. कारण मांसाहारातील प्रथिनांचे प्रमाण नियंत्रित केले पाहिजे. मांसाहारातील प्रथिनांमुळे कॅल्शिअम स्टोन आणि युरिक अ‍ॅसिड स्टोन होण्याचा धोका असतो. मासे, मांस यामध्ये प्रथिनांबरोबरच कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मांसाहाराचे सेवन जास्त करू नये. पित्ताशयात खडे किंवा मूतखडा असेल तर मांसाहार टाळलेलाच बरा.

गोड पदार्थांचे सेवन : गोड पदार्थांमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट प्रमाण खूप जास्त असते. तसेच साखरेच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रॉल घट्टा होते त्यामुळे हृदयरोग तसेच पित्ताशयात खडे होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अतिगोड पदार्थांचे सेवन करू नये.

गर्भनिरोधक गोळ्या : जास्त प्रमाणात किंवा सतत गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणार्‍या महिलांमध्ये पित्ताशयाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे गर्भनिरोधकाचे इतर पर्याय वापरण्याचा विचार करावा कारण पित्ताशयात खडे होऊ शकतात. त्याशिवाय गर्भनिरोधक औषधांचा मूत्रपिंड आणि यकृत यांच्यावर वाईट परिणाम होतो.

कॉफी : कॉफीचे अतिसेवन करत असाल तरीही पित्ताशयावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ज्या लोकांना पित्ताशयाचे खडे होण्याचा किंवा पित्ताशयाच्या काही तक्रारी असतील त्यांनी कॉफीचे सेवन त्वरित बंद करावे. तंदुरुस्त लोकांनीही दिवसभरातून एक किंवा दोन कप कॉफीचे सेवन करावे. यापेक्षा जास्त प्रमाणातील कॉफी सेवन करणे धोकादायक आहे.

सोड्याचे सेवन : पित्ताशयात खडे झाल्यास जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो; पण काही पेय पदार्थ मात्र पित्ताशयाचा त्रास वाढण्यास कारण ठरू शकतात. पित्ताशयात खडे झाल्यास सोडायुक्त पेये बिलकुल सेवन करू नयेत. त्यात फॉस्फोरिक अ‍ॅसिड असते त्यामुळे पित्ताचे खडे वाढतात.

Back to top button