

पिकांच्या संपन्नतेचा काळ या मुख्य रूपातच दिवाळी हा सण साजरा होत असल्याचे दिसते. आपल्यापासून संकटे दूर राहावीत म्हणून कुलदेवीला स्थानिक परंपरेनुसार नैवेद्य दाखविला जातो. या दिवशीच्या सकाळी सगेसोयर्यांसह दिवाळीच्या खास पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. दीपावली उत्सवातील महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. सर्वसाधारणपणे लोक या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करतात. याला मांगलिक स्नानही म्हटले जाते. अंगाला तेल, उटणे आणि अत्तर लावून गरम पाण्याने स्नान केले जाते. अभ्यंगस्नानाच्या प्रथेत आरोग्याची वृद्धी हा महत्त्वाचा घटक आहे. आयुर्वेदाच्या द़ृष्टीने महत्त्वाच्या अशा अनेक वनस्पतींचा समावेश सुगंधी उटण्यात असतो. स्नान करताना आघाडा किंवा अपामार्ग वनस्पतीने अंगावर पाणी शिंपडावे म्हणजेच प्रोक्षण करावे, असा उल्लेख मिळतो. ही औषधी वनस्पती असून देवीला ती आवडते, असे मानले जाते. एकंदर देवतांच्या पत्रपूजेत आघाड्याचा समावेश असतो. स्नानानंतर यमदेवतेला नमस्कार करून जलांजली वाहायची असते. संध्याकाळी पुन्हा दीपदान केले जाते आणि काही ठिकाणी पितृतर्पणदेखील केले जाते. नरक चतुर्दशी साजरी करण्यामध्ये प्रादेशिक विविधता खूप आढळते. सकाळी स्नानानंतर चिरांटं किंवा कारीट नावाचे एक कडू फळ नरकासुराचे प्रतीक म्हणून चिरडले जाते. परंतु, यातही भौगोलिक भिन्नतेनुसार जी वनस्पती उपलब्ध असते, तिचा वापर केलेला दिसतो.
नरक चतुर्दशीबाबत लोकप्रिय पौराणिक कथा आहे, ती नरकासुर वधाची. नरकासुर हा प्राग्ज्योतिषपुराचा राजा होता. त्याला पृथ्वीदेवतेकडून वैष्णवास्त्र मिळाले. त्यामुळे तो उन्मत्त झाला. माणसे, देवादिक अशा सार्यांना पिडा देऊ लागला. राजांना, त्यांच्या मुलींना कारागृहात डांबून ठेवू लागला. अशावेळी इंद्राने श्रीकृष्णाची प्रार्थना केली. मग, श्रीकृष्णाने नरकासुरावर आक्रमण करून त्याचा वध केला. मरताना नरकासुराने आपल्या नावाची आठवण पृथ्वीवर राहावी म्हणून श्रीकृष्णांकडे वर मागितला की, 'आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पिडा होऊ नये.' त्यामुळे तो दिवस नरक चतुर्दशी म्हणून रूढ झाला. मराठी कीर्तन परंपरेत हे प्रसिद्ध आख्यान आजही सादर केले जाते.
भारताच्या अन्य भागांत नरक चतुर्दशीच्या दिवसाला काली चौदस, रूप चौदस, छोटी दिवाली, नरक निवारण चतुर्दशी किंवा भूत चतुर्दशी या नावांनी संबोधले जाते. तेल, फुले आणि चंदन यांचा वापर करून देवपूजा केली जाते. हनुमानाला नारळ अर्पण केला जातो आणि तीळ, गूळ आणि पोहे यांचा प्रसाद दिला जातो. पिकांच्या संपन्नतेचा काळ या मुख्य रूपातच दिवाळी हा सण साजरा होत असल्याचे दिसते. पश्चिम भारतात ताज्या पोह्यांचे पदार्थ विशेषत: बनवले जातात. तंत्रशास्त्राची उपासना करणारे साधक या दिवशी त्यांचा मंत्र शिकतात किंवा ग्रहण करतात.
आपल्यापासून संकटे दूर राहावीत म्हणून कुलदेवीला स्थानिक परंपरेनुसार नैवेद्य दाखविला जातो. या दिवशीच्या सकाळी सगेसोयर्यांसह दिवाळीच्या खास पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. पश्चिम बंगालमध्ये कालीपूजेच्या आधीचा हा दिवस भूत चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. बंगाली सांस्कृतिक परंपरेत काली देवतेस महत्त्वाचे स्थान आहे. मृत आणि जिवंत जीवमात्रांच्या जगांमधील आवरण खूप झिरझिरीत असते आणि या दिवशीच्या संध्याकाळी पितरं आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी येतात, असे चिंतन या निमित्ताने मांडले गेलेले आढळते. आपल्या मागच्या चौदा पिढ्यांमधील पूर्वज यावेळी येतात. त्यांच्यासाठी चौदा दिवे घराभोवती मांडले जातात. घराच्या आतील आणि बाहेरील प्रत्येक अंधारा कोपरा उजळला जातो. विशेष चौदा दिव्यांमुळे आपल्या पितरांना घराकडे यायचा मार्ग कळतो, अशी श्रद्धा आहे.
'काली' या प्रतीकात अनंततत्त्वाचा अर्थ दडला आहे. पार्वतीच्या सौम्य रूपाचा दुसरा आविष्कार म्हणजे काली. 'काल' म्हणजे 'समय.' त्याचं स्त्रीरूप आहे काली. दिवाळीच्या आनंदोत्सवाच्या वेळी विविध प्रसंगी पितरांचं जे स्मरण केले जाते, त्याचे कारण जाणणे महत्त्वाचे आहे. निसर्गातही काली व्यापून असते. जी पानगळ सुरू होते, अस्तित्व संपणे असते, त्यात अबोल खिन्नता असते. त्यात अपरिहार्यतेला शरण जाण्याचा भाव असतो; पण सृजनाची, नव्या अंकुराची एक दूरवरची आशाही तिथेच दडलेली असते. कालीची संहारक शक्ती स्नेहाने परिपूर्ण असते. 'काली' एक अनुभव म्हणून समोर उभी ठाकते, तेव्हा माणसाच्या बौद्धिक यशाचा अहंकार गळून पडतो. आपल्या प्रत्येकाला आयुष्यात कुठेतरी पोहोचायची ऊर्मी असते; पण म्हणजे जायचे तरी कुठे असते? कर्मफलांचा होम प्रत्येकाला पूर्ण करावाच लागतो. आयुष्यातला प्रत्येक क्षणही तर संपतो, मागे पडतो. ही आहे काली!
दीपावलीच्या उत्सवात माणसाच्या आनंदाचे प्रकटीकरण आहे; पण त्याचवेळी गतकाळाचे भान आहे, कृतज्ञता आहे. जिवंत आणि गत जग आणि निसर्गातून मिळालेली धान्यलक्ष्मी यांचे खूप सुंदर संतुलन दिवाळीच्या प्रत्येक दिवसाच्या प्रथेतून साधलेले दिसते.