Latest

सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करणाराही मेसेजमधील मजकुराला तेवढाच जबाबदार : उच्‍च न्‍यायालय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सोशल मीडियावर फॉरवर्ड (पाठवलेला) केलेला संदेश हा धनुष्यातून सुटलेल्‍या बाणासारखा असतो. जोपर्यंत तो संदेश पाठवणाऱ्याकडे राहतो तोपर्यंत तो त्याच्या नियंत्रणात असतो. एकदा तो पाठवल्यानंतर तो सुटलेल्‍या बाणासारखा असतो. त्‍यामुळे मेसेज फॉरवर्ड करणार्‍यानेही यामुळे झालेल्‍या नुकसानीच्या परिणामांची जबाबदार घेतली पाहिजे. मेसेज फॉरवर्ड करणाराही संबंधित मेसेजमधील मजकुराला तेवढाच जबाबदार असतो, असे निरीक्षण नुकतेच मद्रास उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले. ( Social Media Message )

Social Media Message : काय होते प्रकरण ?

एप्रिल 2018 मध्ये तामिळनाडूतील अभिनेता आणि भाजप नेते एस. व्‍ही. शेखर यांच्‍यावर एका महिला पत्रकारांबद्दल फेसबुक अकाऊंटवर अपमानास्पद आणि असभ्य टिप्पणीचा मेसेज फॉरवर्ड केल्याप्रकरणी गुन्‍हा दाखल झाला होता. आपल्‍याविरोधातील फौजदारी कारवाई रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका त्‍यांनी मद्रास उच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती. आपल्‍यास आलेला मेसेज (संदेश) न वाचता केवळ फॉरवर्ड केला. यानंतर त्याच दिवशी अपमानास्पद पोस्ट काढून टाकली आणि माफी मागितली, असा दावाही शेखर यांनी याचिकेतून केला होता.

मेसेज फॉरवर्ड करण्‍यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे

एस. वे. शेखर यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर न्यायमूर्ती आनंद व्यंकटेश यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्‍या. आनंद व्‍यंकटेश यांनी स्‍पष्‍ट केले की," शेखर हे समाजतील नावाजलेले व्‍यक्‍ती आहेत. एखादी व्यक्ती समाजात जितकी जास्त लोकप्रिय तितकीच तो समाजाला दॆणारा संदेशासाठी जबाबदार असतो. त्‍यामुळेच शेखर यांनी आपल्‍या फेसबुक खात्यावरून मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे होते.सोशल मीडियावर कोणताही संदेश फॉरवर्ड करण्‍यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे होते. आता याचिकाकर्ता माफी मागून या प्रकरणातून पळ काढू शकत नाही. हे प्रकरण केवळ बिनशर्त माफी मागण्‍यापूरते मर्यादीत नाही," असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

मेसेज फॉरवर्ड करताना सामाजिक जबाबदारीचे पालन केलेच पाहिजे

यावेळी न्‍यायमूर्ती आनंद व्‍यंकटेश यांनी स्‍पष्‍ट केले की, "आज सोशल मीडियाने प्रत्येक व्यक्तीचे जीवन अक्षरशः व्यापले आहे. प्रत्‍येक मेसेज जगाच्‍या कानाकोप्‍यात काही क्षणात पोहोचू शकतो. आम्ही आभासी माहितीच्या 'अतिसारा'ने ग्रस्त आहोत. सोशल मीडियावर प्रत्येकजण संदेशांचा भडिमार करत आहे. त्यामुळे समाजमाध्यमांमध्ये संदेशाच्या रूपात जी देवाणघेवाण होते, त्याचा अल्पावधीतच फार मोठा प्रभाव पडतो. त्‍यामुळे कोणताही मेसेज तयार करताना आणि तो फॉरवर्ड करताना प्रत्‍यके व्‍यक्‍तीने सामाजिक जबाबदारीचे पालन केलेच पाहिजे."

Social Media Message : फॉरवर्ड केलेला मेसेज हा कायमचा पुरावा

जेव्हा संबंधित व्यक्ती, त्याच्या पदामुळे, सामान्य लोकांच्या मनावर खरोखर प्रभाव टाकू शकते तेव्हा सोशल मीडियावर फॉरवर्ड केलेला मेसेज हा कायमचा पुरावा बनतो. मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर होणार्‍या परिणामाची जबाबदारी झटकता येत नाही. आक्षेपार्ह संदेश पाठविणारी व्‍यक्‍तीएवढीच फॉरवर्ड करणारी व्‍यक्‍तीही जबाबदार ठरते. एकदा नुकसान झाले की, पाठवणारा माफी मागून त्यातून बाहेर पडू शकत नाही, असेही निरीक्षण न्‍यायालयाने नोंदवले.

फॉरवर्ड केलेला मेसेज हा धनुष्यातून सुटलेल्‍या बाणासारखा

"सोशल मीडियावर फॉरवर्ड केलेला मेसेज हा धनुष्यातून बाणासारखा असतो. जोपर्यंत तो संदेश पाठवणाऱ्याकडे राहतो तोपर्यंत तो त्याच्या नियंत्रणात असतो. एकदा तो पाठवल्यानंतर, तो बाणासारखा असतो, जो आधीच मारला गेला आहे.
त्‍यामुळेच मेसेज पाठवणार्‍याने यानंतर झालेल्‍या नुकसानीच्‍या परिणामांची जबाबदारी घेतली पाहिजे. एकदा नुकसान झाले की, माफीचे निवेदन देऊन त्यातून बाहेर पडणे फार कठीण होईल," असेही न्यायमूर्ती व्यंकटेश यांनी स्‍पष्‍ट केले.
या प्रकरणात एस.व्‍ही. शेखर यांनी फेसबूकवर फॉरवर्ड केलेल्या मेसेजमुळे पत्रकारांचा आणि विशेषत: महिला पत्रकारांचा अपमान झाला ज्यामुळे त्याच्या घरासमोर निदर्शने आणि हिंसाचारही झाला. अशा प्रकारे, न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणात गुन्हा घडवून आणला गेला. त्‍यामुळेच सार्वजनिक शांततेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कारण घटनेनंतर लगेचच राज्यभर हाहाकार माजला होता, असेही न्‍यायालयाने नमूद केले.

Social Media Message

याचिकाकर्ता माफी मागतोय म्हणून त्याला सोडले जाऊ शकत नाही

"मेसेज फॉरवर्ड करणार्‍या व्यक्तीचा अर्थ मेसेजमधील मजकूर मान्य करणे असा होतो. मेसेज इतरांना फॉरवर्ड करण्याची जबाबदारी पाठवणार्‍यालाच घ्यावी लागते. एखाद्या व्यक्तीने फॉरवर्ड केलेल्या मेसेजला लाइक्स पाहून आनंद होतो. तसेच त्या संदेशात अपमानास्पद मजकूर असल्यास परिणामांना सामोरे जाण्यासाठी देखील तितकेच तयार असले पाहिजे. या प्रकरणात याचिकाकर्ता माफी मागतोय म्हणून त्याला सोडले जाऊ शकत नाही. शेखर यांच्या माफीनाम्यावर कारवाई होऊ शकत नाही आणि केवळ याच आधारावर त्यांच्यावरील फौजदारी कारवाई रद्द करता येणार नाही, असे स्‍पष्‍ट करत मद्रास उच्‍च न्‍यायालयाने शेखर यांेची याचिका फेटाळली. तसेच त्‍यांच्‍या विरोधातील सर्व फौजदारी कार्यवाही विशेष न्यायालय, सिंगारावेलर मालीगाई यांच्याकडे हस्तांतरित केली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT