Latest

Pakistan election results 2024 | पाकिस्तान निवडणूक- इम्रान खान यांच्या PTI चा पाठिंबा असलेले उमेदवार आघाडीवर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली निवडणुकीची शुक्रवारी सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले होते. आतापर्यंत २६५ पैकी केवळ १२ जागांचे निकाल अधिकृतपणे जाहीर झाले आहेत. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचा (PTI) पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार अनेक मतदारसंघात आघाडीवर आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या 'पीएमएल-एन'समोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. (Pakistan election results 2024)

इम्रान खान यांच्या पक्षाचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवारांनी ५ जागा मिळवल्या आहेत. तर ४ जागा माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) (पीएमएल-एन) ने जिंकल्या आहेत.

तर तीन जागा बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने मि‍ळवल्या आहेत.

आतापर्यंत केवळ १२ राष्ट्रीय असेंब्लीच्या जागांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे, त्यानुसार पक्षांना मिळालेल्या जागा खालीलप्रमाणे-

पीटीआय – ५ जागा
पीएमएल-एन – ४ जागा
पीपीपी – ३ जागा

पाकिस्तान गुरुवारी सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ते सुरू राहिले. १२ कोटींहून अधिक मतदारांना मतदान करता यावे यासाठी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आणि अनिवार्य एक तासाचा निर्बंध संपल्यानंतर वैयक्तिक मतदान केंद्रांचे निकाल लागले. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचा पाठिंबा असलेल्या काही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. त्यांनी मतदान केंद्रांमध्ये छेडछाड आणि मतमोजणी जाणूनबुजून थांबविल्याचा आरोपही केला आहे.

पाकिस्तानात गुरुवारी नॅशनल असेंब्लीसाठी मतदान सुरू असताना दहशतवाद्यांनी लज्जा येथे मतदान केंद्राजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात सात पोलिसांचा मृत्यू झाला. याखेरीज अन्यत्र विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात दोन बालकांसह ९ जण ठार झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेटवरच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. तथापि, त्यामुळे लोक आणखी प्रक्षुब्ध झाले आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातूनच टपालाद्वारे मतदानाचा हक्क बजावला होता. (Pakistan election results 2024)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT